हा तर कमलापूर हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव.. स्थलांतरणावरून पुन्हा नागरिकांमध्ये वाढतोय रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 12:46 PM2022-05-17T12:46:40+5:302022-05-17T12:52:44+5:30

हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

people opposition to shifting elephants of kamlapur camp from Maharashtra to Gujarat | हा तर कमलापूर हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव.. स्थलांतरणावरून पुन्हा नागरिकांमध्ये वाढतोय रोष

हा तर कमलापूर हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव.. स्थलांतरणावरून पुन्हा नागरिकांमध्ये वाढतोय रोष

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व स्तरातून होत आहे हत्तींना रोखण्याची मागणी

गडचिरोली : कोणतीही गरज नसताना राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पसह पातानील व ताडोबातील बहुतांश हत्ती गुजरातला पाठविण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये पुन्हा असंतोष वाढत आहे. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये हत्तींच्या स्थलांतराबाबत पहिले पत्र आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातून विरोधाचा सूर आळवला गेला. त्यामुळे हत्तींना गुजरातला हलविण्याचा निर्णय स्थगित ठेवला होता; पण आता पुन्हा हत्ती हलविण्याचे पत्र पाठविल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष वाढला आहे. गडचिरोली जिल्हाच नाही, तर महाराष्ट्राचे हे वनवैभव वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हत्ती कॅम्पमधील पर्यटकांचा वावर वाढल्यामुळे नक्षली कारवायादेखील कमी झाल्या आहेत. येथील नागरिकांना नवा रोजगार मिळाला आहे. पुढे जसजशा सोयी वाढतील तसतसे पर्यटक वाढून रोजगारही वाढेल. असे असताना हत्ती कॅम्प पर्यटनाच्या दृष्टीने वाढविण्याचे सोडून या हत्तींना गुजरातमध्ये नेण्याचा डाव जनता यशस्वी होऊ देणार नाही, अशी भावना युवक काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. प्रणितकुमार जांभुळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली.

हत्ती पोसणे जड झाले का?

उद्योगविरहित, पण निसर्गसौंदर्याने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हत्ती कॅम्प हे प्रमुख आकर्षण आहे. जसजसी या हत्ती कॅम्पची माहिती मिळत आहे तसतसा महाराष्ट्र, तेलंगणातील पर्यटकांचा औढा हत्ती कॅम्पकडे वाढत आहे. अशा स्थितीत हत्तींच्या सोयीसुविधा, वैद्यकीय तपासण्या, देखभालीकडे विशेष लक्ष देण्याऐवजी या हत्तींना दुसऱ्या राज्यात पाठविणे म्हणजे आम्ही ते हत्ती पोसण्यासाठी सक्षम नाही, असा जणू संदेश वन्यजीव विभागाची यंत्रणा आणि राज्य शासन देऊ पाहत आहे का, असा संतप्त सवालही अनेकांनी व्यक्त केला.

- तर लोक रस्त्यावर उतरतील

कमलापूर हत्ती कॅम्प हे राज्यासह जिल्ह्याचे वैभव आहे. येथील नागरिकांचे या परिसराशी भावनिक नाते जुळले आहे. त्यामुळे हत्ती स्थलांतर होणार या बातमीने अनेकांमध्ये असंतोषाचे वातावरण बघायला मिळत आहे. समाजमाध्यमांवर त्याचे पडसाद उमटत आहे. जनभावनेचा आदर न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पुन्हा नक्षल्यांचे माहेरघर बनवू नका

कधीकाळी नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कमलापूरला आता हत्तींमुळे नवीन ओळख मिळाली आहे. अशा स्थितीत हत्तींना येथून हलविणे म्हणजे पुन्हा हा परिसर नक्षल्यांच्या ताब्यात येण्यासारखे आहे. कमलापूरला पुन्हा नक्षल्यांचे माहेरघर बनवू नका, त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हत्ती कॅम्प वाचवावा, अशी भावना जिल्हा युवा पुरस्कारप्राप्त समाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी व्यक्त केली.

Web Title: people opposition to shifting elephants of kamlapur camp from Maharashtra to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.