रवीवासीयांना हिंस्त्र प्राण्यांपासून धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:41 AM2021-08-21T04:41:39+5:302021-08-21T04:41:39+5:30
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील रवी गाव परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. नागरिकांना शेतात, तसेच अन्य गावाला कामानिमित्त ये-जा करावी ...
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील रवी गाव परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. नागरिकांना शेतात, तसेच अन्य गावाला कामानिमित्त ये-जा करावी लागते. गावाच्या सभोवताली दाट झाडे झुडपे आहेत. या ठिकाणी हिंस्त्र प्राणी दबा धरून राहू शकतात. हिंस्त्र प्राण्यांपासून नागरिकांना धाेका असल्याने गावालगतीची झुडपी ताेडावी, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
रवी जंगल परिसरात वाघ, अस्वल, बिबट्या, डुक्कर यासह अन्य वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. दाेन वर्षांपूर्वी रवी येथील एका इसमाला वाघाने ठार केले हाेते, तर एकाला जखमी केले हाेते. सध्या या भागात वाघाचा वावर आहे. अनेकदा नागरिकांना वाघाचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघांपासून धाेका पाेहाेचू नये, यासाठी तीन वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटरपर्यंची झुडपी ताेडली हाेती. त्यामुळे परिसर स्वच्छ झाला हाेता, परंतु तीन वर्षांनंतर आता पुन्हा झुडपी वाढली आहेत. झुडपे ताेडण्याकडे वनविभागही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावाजवळ फिरणाऱ्या लहान मुलांनाही धाेका हाेऊ शकताे. हा धाेका टाळण्यासाठी वनविभागाने वेळीच उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.