क्रांतिदिनी जिल्ह्यात उसळला होता जनक्षोभ
By Admin | Published: August 9, 2015 01:35 AM2015-08-09T01:35:15+5:302015-08-09T01:35:15+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या १८५७ च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर संबोधले त्या स्वातंत्र्य समरादरम्यान वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांनी इंग्रजांना सळो की, पळो...
क्रांती दिन विशेष
गडचिरोली : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या १८५७ च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर संबोधले त्या स्वातंत्र्य समरादरम्यान वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांनी इंग्रजांना सळो की, पळो करून सोडले होते. या थोर आदिवासी क्रांती पुरूषाची प्रेरणा घेऊन गडचिरोली जिल्ह्यातही क्रांतिदिनी जनक्षोभ उसळला होता. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांशी झुंजणारे स्वातंत्र्य सैनिक स्व. मारोतरावजी नरोटे यांचे स्मारक गडचिरोली शहरातील त्रिमूर्ती चौकात आहे. शहरातील गांधी चौकातील ‘जयस्तंभ’ सुध्दा भारताच्या स्वातंत्र्यात जिल्ह्यातील विरांनी दिलेल्या योगदानाची साक्ष अजूनही देत आहे. या स्मारकांमुळे जिल्ह्यातील पिढींना प्रेरणा मिळत आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या जिल्ह्याच्या सुपुत्रांना कायम स्मरणात ठेवता यावे, हा यामागील उद्देश आहे. चांद्यातील ब्रिटिशविरोधी क्रांतीची आग गडचिरोलीतही पोहोचली होती. येथील जगन्नाथ शंखदरवार आणि मारोतराव नरोटे या लढ्यात अग्रणी होते. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी चांगलीच झुंज दिली. याशिवाय मोतिराम वाणी, विठ्ठल गुड्डेवार, जाफरभाई, शंकरराव झोटिंग, जे. टी. पाटील म्हशाखेत्री, मुराभाई, धोंडबा खडसे, पाराशर असे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या काळात सक्रिय होते.
आरमोरी येथील थोर स्वातंत्र्य सेनानी कृ. व्यं. ताडुरवार गुरूजी यांनीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. आरमोरीतील पहिले शिक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला. आपल्या क्षेत्राचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधीही त्यांना मिळाली. त्यांचा जन्म १ जानेवारी १९१६ मध्ये झाला. तर त्यांचे निधन १८ मार्च १९६० रोजी झाले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन आरमोरी येथील पंचायत समितीच्या बाजुला १ जानेवारी १९९८ मध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. (शहर प्रतिनिधी)