मेळाव्यातून शासन लोकांच्या दारी
By admin | Published: April 11, 2017 01:01 AM2017-04-11T01:01:10+5:302017-04-11T01:01:10+5:30
नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.
पोलिसांचा पुढाकार : दुर्गम भागात २००५ पासून ११३७ जनजागरण मेळावे
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. २००५ पासून ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ११३७ जनजागरण मेळाव्यातून पोलीस प्रशासनाने हजारो लोकांशी संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात नक्षलवादी कारवायांच्या उदय झाला. याचा थेट परिणाम विकास प्रक्रियेवर झाला. सुरुवातीच्या काळात दुर्गम व अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या विचारांना समर्थन देणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र कालांतराने सरकार व पोलीस यंत्रणेने लोकांशी संवाद वाढविला. यासाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी अशा आयुधांचा वापर केला जाऊ लागला. गडचिरोली या मागास जिल्ह्यात पोलीस हे प्रशासनच मुख्य अंग आहे. त्यामुळे पोलिसांनी या कामात पुढाकार घेतला.
२००५ मध्ये ९९, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये ४१, २००८ मध्ये २२, २००९ साली ४२, २०१० मध्ये ९, २०११ मध्ये २०, २०१२ मध्ये ५२, २०१३ मध्ये २१३, २०१४ मध्ये १७९, २०१५ मध्ये २१६, २०१६ मध्ये १९६ व २०१७ मध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ९ जनजागरण मेळावे पार पडले. या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
महसूल प्रशासनाच्या अनेक प्रमाणपत्रांचे वाटप नागरिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. आरोग्य, वन, आदिवासी विकास, पशुसंवर्धन आदी विभागाच्या योजनांची माहिती देऊन त्याचे अर्जही या मेळाव्यातून लाभार्थ्यांकडून भरून घेतले जाऊ लागले. तसेच गावातील तरूण युवक, युवतींसाठी क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन अलिकडच्या काळात जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून केले जाऊ लागले आहे. मेळाव्यात नागरिकांना संसारोपयोगी साहित्यांचेही वितरण केले जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही काही जनजागरण मेळाव्यांना हजेरी लावून लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सोबत राहून विकास प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले.
जनजागरण मेळाव्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण भागात नक्षलवाद्यांचा दबाव कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जनजागरण मेळावे व एकूण सोशल पोलिसिंग हे पोलीस यंत्रणेचा कणा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)