सूरजागड प्रकल्पाविरोधात रोष; संतप्त व्यापारी बैठकीत आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:08 PM2023-05-22T12:08:58+5:302023-05-22T12:16:10+5:30
जनआंदोलनाची तयारी: बैठकीत आश्वासनावर बोळवण; धूळ, प्रदूषणातून आरोग्याशी खेळ
आलापल्ली (गडचिरोली) : बेदरकार वाहतूक, रोज शेकडो वाहनांची रेलचेल, गोंगाट, धूळ, प्रदूषण अन् सतत होणारे अपघात यामुळे आलापल्लीकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. २० मे रोजी शिक्षकाचा बळी गेल्यानंतर २१ मे रोजी पोलिस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने व्यापारी व लॉयड मेटल्स कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अहेरीत झाली. यावेळी व्यापारी व स्थानिकांनी सूरजागड लोहखाण प्रकल्पाविरोधात तीव्र संताप व रोष व्यक्त केला.
कंपनीच्या प्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर बोळवण केली. त्यामुळे नागरिकांनी जनआंदोलनाची तयारी केली आहे. आलापल्लीहून नागेपल्लीकडे दुचाकीवरून निघालेले आश्रमशाळा शिक्षक वसुदेव मंगा कुळमेथे (वय ४५, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) यांचा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २० मे रोजी घडली. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय कुळमेथे यांच्या नातेवाइकांनी भररस्त्यात ठिय्या देत राेष व्यक्त केला होता. २१ मे राेजी अहेरीतील प्राणहिता पोलिस कॅम्प येथे बैठक झाली. यावेळी उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, सरपंच शंकर मेश्राम, मुनेश्वर हडपे, महावीर अग्रवाल, राजेश गोयल, विजय निमलवार, अज्जू पठाण, विनोद कावेरी, विजय गुप्ता, अमोल कोलपकवार व लॉयड मेटल्स कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प
दरम्यान, सूरजागड खाणीतील लोह वाहतुकीमुळे जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरू असताना लोकप्रतिनिधींनी मिठाची गुळणी धरली आहे. खासदारांसह तिन्ही आमदार यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. बेदरकार वाहतुकीने सामान्यांचे बळी जात असताना लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून का बसलेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.
या प्रश्नांवर गाजली बैठक....
अहेरीत झालेल्या बैठकीत आलापल्लीतील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, शाळेच्या वेळेत जड वाहने बंद ठेवावीत, धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज स्वच्छता करावी, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांत शंभर मीटर अंतर ठेवावे, रुग्णवाहिका उपलब्ध करावी, आलापल्ली ते नागेपल्लीदरम्यान पथदिवे व सीसीटीव्ही लावावेत, अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले.
...म्हणून स्थानिकांमध्ये नाराजी
यापूर्वी खुद्द जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी आलापल्लीत बैठक घेऊन सूरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे होणारा त्रास व अपघात रोखण्यासाठी उपाय करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांतच स्थानिकांची निराशा झाली. अपघातसत्र , धूळ, प्रदूषणाचा त्रास कमी होत नाही. त्यामुळे आताही केवळ आश्वासने दिली. त्याची पूर्तता होईल की नाही, याची शंका असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी कायम आहे.