कुणबी समाजाचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:50 PM2018-12-27T22:50:03+5:302018-12-27T22:50:45+5:30
कुणबी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात २० हजार पेक्षा अधिक कुणबी समाज बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या एकतेचा प्रत्यय आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुणबी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात २० हजार पेक्षा अधिक कुणबी समाज बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या एकतेचा प्रत्यय आला.
समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने मागील वर्षी गडचिरोली येथे मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यातही जवळपास ३० ते ४० हजार कुणबी समाज बांधव सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित असलेला गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलाच मेळावा ठरला होता. यावर्षी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही जुन्या मोर्चांच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडत २० हजार पेक्षा अधिक नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदविला. जवळपास तीन किमी पेक्षा अधिक अंतर मोर्चाची लांबी होती. समोरचे व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोहचले तरी मागचे मोर्चेकरी बाजार चौकापर्यंतच होते. यावरून मोर्चाचा व्याप लक्षात येते. इंदिरा गांधी चौक ते बसस्थानकापर्यंत मी कुणबी अशी टोपी घातलेल्या महिला, युवक व नागरिकांचे जत्थे दिसून येत होते. शिवाजी महाविद्यालयाचा परिसर नागरिकांनी फुलून गेला होता. जिल्ह्याच्या चारही भागातून नागरिक वाहनाने येणार असल्याने चौकात गर्दी होऊ नये, यासाठी चारही मार्गावर वाहने ठेवण्याची जागा निश्चित करण्यात आली होती. जवळपास २ वाजता मोर्चाला सुरूवात झाली.
मोर्चाचे नेतृत्व आमदार परिणय फुके, सुनील केदार, नरेंद्र जिचकार, रवींद्र दरेकर, प्रशांत वाघरे, नगरसेवक सतीश विधाते, महेंद्र ब्राह्मणवाडे, रमेश चौधरी, अरूण मुनघाटे यांनी केले. माजी खासदार नाना पटोले यांनी सुध्दा मोर्चाला हजेरी दर्शविली.
विराट मोर्चात दिसले शिस्तीचे दर्शन
जवळपास २५ हजार नागरिक एका ठिकाणी आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवाजी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे अंतर जवळपास पाच किमी आहे. पाच किमी अंतर कापून मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. एवढे मोठे लांब अंतर व नागरिक असतानाही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. अगदी शिस्तबध्द पध्दतीने मोर्चेकरी जात होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर समाजातील नेत्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर मोर्चेकरी आपापल्या गावी परतले.
मी कुणबी
मोर्चेकऱ्यांनी ‘मी कुणबी’ असे लिहिल्या टोप्या लावल्या होत्या. तसेच हातात कुणब्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, कुणबी एकता जिंदाबाद, कुणबी समाजाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करा, आदी मागण्यांचे फलक झळकत होते. घोषणांमुळे गडचिरोली शहर दणाणून गेले.
वाहतूक विस्कळीत
मोर्चेकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा अंदाज पोलीस विभागाला आल्यानंतर पोलिसांनी बसस्थानक ते आयटीआय चौकापर्यंत एकतर्फी वाहतूक केली होती. आयटीआय चौकातून वाहतूक एलआयसी कार्यालय मार्गे वळविण्यात आली होती. एकतर्फी वाहतूक असल्याने जवळपास तीन तास शहरातील वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र याही दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. नागरिक अगदी शांतपणे मार्ग काढत होते.
या आहेत महामोर्चातील मागण्या
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्या, नोकरभरती संदर्भातील पेसा अंतर्गत राज्यपालांनी निर्गमित केलेल्या अधिसूचनेत सुधारणा करून सर्व प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, कुणबी जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करून एससी, एसटीप्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, धानाला प्रति क्विंटल चार हजार रूपये हमीभाव देण्यात यावा, शासनाने गठीत केलेल्या जनजाती सल्लागार समितीचा अहवाल तत्काळ जाहीर करून निर्णयातील तरतूदीनुसार कार्यवाही करावी, वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, कुणबी जातीला अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे, कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, कुणबी जातीचा समावेश एसईबी प्रवर्गात करून कुणबी समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित समाज बांधवांना नागपूर येथील आकाश टाले, श्रध्दा सुसे, अर्जुनी मोरगाव येथील संजीवनी खोटेले, कोंढाळातील पंकज धोटे, चंचल रोहणकर, पोर्लाची प्रतीक्षा हुलके, संतोष रोहणकर, मेघा रामगुंडे, सचिन मोरांडे यांनी मार्गदर्शन केले.