माल वाहतुकीस मिळाली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:44+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता सदर निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यात जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक सेवेसह खासगी सेवेवरील बंदी कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित जिल्ह्यांमधून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी (जवळपास ६ हजार) असली तरी अद्याप प्रत्यक्षात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. कोरोना नियंत्रणासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांमुळे स्थिती नियंत्रणात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता सदर निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यात जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक सेवेसह खासगी सेवेवरील बंदी कायम आहे.
जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रि या संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून आपल्या आधीच्या आदेशात अंशत: सुधारणा केली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण क्षेत्रात जीवनाश्यक वस्तुंसह इतर सर्व वस्तुंच्या वाहतुकीस नेहमीप्रमाणे परवानगी दिली आहे. मात्र या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून मानवी वाहतुकीस प्रतिबंध राहणार आहे. एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी बसेस, एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाºया सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी, तर एका प्रवाशासह ऑटोरिक्षा वाहतूक करता येणार आहे. खासगी वाहन वाहतुकीसासाठी वाहन चालकाव्यतिरिक्त केवळ एका व्यक्तीला उपयोगात आणता येईल. वाहनांचे चालक व वाहक यांच्या भोजन व्यवस्थेकरीता योग्य ढाब्यावर प्रत्यक्ष जेवन न करता पार्सलद्वारे भोजन व्यवस्था करण्यासंदर्भात तहसीलदारांनी उपाययोजना करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शिवभोजन देणाºया संस्थांंनी एका टेबलवर एक व्यक्ती याप्रमाणे बसण्याची व्यवस्था करून हॉटेल सुरू ठेवावे. मात्र या व्यतिरीक्त बाकी सर्व हॉटेल बंद राहतील
यापूर्वी निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील अटी व शर्ती/निर्देश कायम राहतील, असे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी कळविले. जिल्ह्यात आतापर्यंत २३ जणांना संशयमुक्त करण्यात आले आहे.
१० लोकांना टाकले विलगीकरण कक्षात
कोरोनाबाधित जिल्ह्यांमधून आलेल्या जवळपास ६ हजार लोकांना त्यांच्या घरातच इतर लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहण्याचा (होम क्वॉरंटाईन) सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यावर हातांवर तसे शिक्केही मारण्यात आले. मात्र तरीही सूचनांचे पालन न करता बाहेर फिरणाºया १० जणांना देसाईगंज येथील विलगिकरण कक्षात टाकण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी दिली. इतर सर्व ठिकाणचे विलगिकरण कक्ष सध्या रिकामे आहेत.
किराणा दुकानांसाठी १० ते ३ ची वेळ
जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाऱ्या किराणा सामानाच्या विक्रीसाठी गडचिरोलीत दुकानदारांना सकाळी १० ते ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. याशिवाय नियमित ग्राहकांना किराणा सामान घरपोच देण्याची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्यांना किंवा दुकानांमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काही अडचण येऊ नये म्हणून ओळखपत्र देण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.