चामोर्शीतील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:58 PM2017-12-27T23:58:44+5:302017-12-27T23:58:58+5:30
गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी? असे प्रश्न उपस्थित करीत या महोत्सवासाठी संकलित करण्यात आलेल्या निधीत घोळ झाला, त्याची चौकशी करा अशी मागणी बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. यामुळे जि.प.च्या वर्तुळात खळबळ उडाली. शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले.
ज्येष्ठ सदस्य अॅड.राम मेश्राम यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी सभापती अतुल गण्यारपवार यांनी या शताब्दी महोत्सवावरून चांगलाच संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शाळेचा शताब्दी महोत्सव असताना त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेण्याची गरज नव्हती का? ती घेतली का? असे प्रश्न केल्यानंतर शिक्षणाधिकारी ओ.बी. गुढे यांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय शाळा व्यवस्थापन समिती आयोजक म्हणून असणे गरजेचे असताना आमदार डॉ.देवराव होळी यांनी स्वत:चे नाव आयोजक म्हणून टाकून स्वत:चा गवगवा केला. बीडीओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनाही हेतूपुरस्सर डावलल्याचा आरोप गण्यारपवार यांनी केला.
लाखोंच्या देणग्या गेल्या कुठे?
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी काही अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांची देणगी गोळा करण्यात आली. पण प्रत्यक्ष शाळेची साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही किंवा शाळेतील सुविधांसाठी कोणताही हातभार लावला नाही. मग गोळा केलेल्या लाखो रुपयांच्या देणग्या कुठे गेल्या? त्याचा हिशेब सादर करावा, अशी मागणी अतुल गण्यारपवार यांनी केली.
विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माजी विद्यार्थ्यांना डावलले
शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सदर जि.प.शाळेत शिकलेल्या आणि विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव होणे अपेक्षित होते. त्यात प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, स्थानिक जि.प.सदस्य तथा बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारवार, माजी सभापती गंगाधरराव गण्यारपवार यांच्यासह अनेक डॉक्टर, अभियंते, उद्योजक या शाळेत शिकलेले आहेत. पण कोणालाही कार्यक्रमाचे साधे निमंत्रणसुद्धा दिल्या गेले नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.