तेंदूच्या पानांप्रमाणे मोजल्या लाचेच्या नोटा.. बीडीओ फरार, पेसा समन्वयक जाळ्यात

By संजय तिपाले | Published: August 26, 2023 01:18 PM2023-08-26T13:18:59+5:302023-08-26T13:22:47+5:30

अहेरीत 'एसीबी'ची कारवाई: खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारले एक लाख ३० हजार 

Pesa coordinator in the trap of acb while accepting bribe of 1 lakh 30k, BDO absconding | तेंदूच्या पानांप्रमाणे मोजल्या लाचेच्या नोटा.. बीडीओ फरार, पेसा समन्वयक जाळ्यात

तेंदूच्या पानांप्रमाणे मोजल्या लाचेच्या नोटा.. बीडीओ फरार, पेसा समन्वयक जाळ्यात

googlenewsNext

गडचिरोली : तेंदूपत्ता युनिटचा लिलावात समावेश करुन वाहतुकीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी व तालुका पेसा समन्वयक यांनी खासगी व्यक्तीमार्फत व्यापाऱ्याकडून एक लाख ३० हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडून तालुका पेसा समन्वयकाला ताब्यात घेतले.  गटविकास अधिकारी फरार आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अहेरी येथे ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान तेंदूंच्या पानांप्रमाणे अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम मोजली.
 
तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) संजीव येल्ला कोठारी (वय ४२) व खासगी व्यक्ती अनिल बुधाजी गोवर्धन (वय ३०, रा.व्यंकटापूर ता. अहेरी) अशी अटकेतील दोघांची नावे आहे तर गटविकास अधिकारी प्रतीक दिवाकर चन्नवार हा फरार आहे. चन्नवार हा अहेरीत प्रभारी गटविकास अधिकारी आहे. तकारदार यांचे तेंदुपत्ता युनिट आहे. ते युनिट लिलावात घेऊन सदर तेंदुपत्त्याच्या वाहतूक परवान्याकरीता त्यांना गट विकास अधिकारी यांच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. ते  देण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी या दोघांनी एक लाख ३० हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने गटचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून तक्रार केली. त्यानंतर उपअधीक्षक  अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  श्रीधर भोसले यांनी लाच मागणी पडताळणी केली. यात  सन २०२२ यावर्षी  तेंदुपत्ता युनिट लिलावात घेऊन सदर तेंदूपत्त्याच्या वाहतूक परवान्याकरीता त्यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दोघांनी पंचांसमक्ष लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अहेरी ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.  पो.नि. शिवाजी राठोड, हवालदार नथ्थू धोटे, पो.ना. राजेश पदमगिरवार, किशोर जोजारकर, पोलिस शिपाई संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रफुल्ल डोलीकर यांचा कारवाईत सहभाग होता.

गटविकास अधिकाऱ्याचा शोध सुरु

लाचेची १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना  २५ ऑगस्टला खासगी व्यक्ती अनिल गोवर्धन यास अहेरीत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यानंतर तालुका समन्वयक संजीव कोठारीला ताब्यात घेतले. कारवाईची कुणकुण लागताच गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे उपअधीक्षक अनिल लोखंडे यांनी सांगितले.

Web Title: Pesa coordinator in the trap of acb while accepting bribe of 1 lakh 30k, BDO absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.