पेसा शिक्षकभरती... जागा ७१; पडताळणीसाठी होणार २६२ जणांची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 01:08 PM2023-09-25T13:08:02+5:302023-09-25T13:09:23+5:30
आदिवासी बेरोजगारांना संधी : दुर्गम भागातील शाळांमध्ये मिळेल नियुक्ती
गडचिराेली : जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक शाळा व हायस्कूलमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा परिणाम मुलांच्या अध्ययनावर हाेत आहे. अशा स्थितीतही शासनाकडून प्राथमिक शिक्षणाची पदे भरली जात नव्हती. अनेक पदे पेसा क्षेत्रात येत असल्याने पात्र उमेदवारांअभावी ती रिक्त हाेती; परंतु आता पवित्र पाेर्टलने निर्देशित केल्यानुसार पेसा क्षेत्रातील प्राथमिक शाळांमधील ७१ रिक्त जागांवर शिक्षकांची पदभरती हाेणार आहे. यासाठी २६२ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी मंगळवार २६ सप्टेंबर राेजी हाेईल.
जिल्ह्यात १६५० हून अधिक गावे आहेत. यापैकी १३५० च्यावर गावांचा समावेश पेसा क्षेत्रात हाेताे. या गावांमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी वर्गातील पदांच्या भरतीसाठी पेसा अधिनियम लागू आहे. त्यानुसार विविध पदांची भरती अनुसूचित जमाती प्रवर्गातून केली जात आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पेसा क्षेत्रातील पदभरती अनुसूचित जमाती प्रवर्गातून झाली नव्हती. पहिल्यांदाच पेसा क्षेत्रातील शिक्षकांची पदभरती पेसा अधिनियमांतर्गत केली जात आहे. जागा कमी व इच्छुक जास्त असल्याने काेणाचा नंबर लागणार याची धाकधूक उमेदवारांमध्ये आहे.
दाेन वर्षांपूर्वी नाॅनपेसा क्षेत्रात भरती
दाेन वर्षांपूर्वी पवित्र पाेर्टलमार्फत जिल्हा परिषदअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची पदभरती झाली हाेती; परंतु यावेळी केवळ नाॅनपेसा क्षेत्रात शिक्षकांची पदभरती केली. तेव्हापासून पदभरती झाली नाही. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने वर्गाध्यापन करताना शिक्षकांसमाेर अनेक आव्हाने आहेत. अशा स्थितीत आता पेसा क्षेत्रातील पदभरती केली जात असल्याने आदिवासी व दुर्गम भागातील शिक्षकांची पदे भरण्यास मदत मिळेल.
काेणत्या कागदपत्रांची हाेईल पडताळणी?
जिल्हा परिषद (प्राथमिक) शिक्षण विभागांतर्गत वीर बाबूराव सेडमाके सभागृहात शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांची मूळ दस्तावेज तपासणी केली जाईल. तपासणी सूचीप्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे, स्वसाक्षांकित छायांकित प्रतीचा संच, विहित नमुन्यातील ए-४ साईजचा स्वघोषणापत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तसेच एक पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
हायस्कूलमधील रिक्त पदे केव्हा भरणार?
गडचिराेली जिल्हा परिषदअंतर्गत १० हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालये आहेत. येथील माध्यमिक शिक्षक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन अध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. ती रिक्त पदे केव्हा भरणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, अनेक माध्यमिक शिक्षक सेवानिवृत्त झाले, तर काही माध्यमिक शिक्षक पदाेन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी, तर काहीजण गटशिक्षणाधिकारी बनले. ही रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.
पवित्र पोर्टलने निर्देशित केल्यानुसार पेसा क्षेत्रातील जि. प. प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. कागदपत्र पडताळणीसाठी गृहित धरलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेत मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे.
- आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.