कालौघात आलेले पत्रकारितेतील बदल स्वीकारावेच लागतील- पेठकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 10:22 PM2019-01-06T22:22:54+5:302019-01-06T22:23:47+5:30
अलिकडे सर्वच क्षेत्रात आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याला पत्रकारिताही अपवाद नाही. आता पत्रकारिता हा व्यवसाय झाला आहे आणि या व्यवसायाशी प्रामाणिक राहणे यात गैर काहीच नाही. नैतिकतेच्या संकल्पना बदलत चालल्याने सगळ्यांशी जुळवून घेत पत्रकारिता करावी लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अलिकडे सर्वच क्षेत्रात आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याला पत्रकारिताही अपवाद नाही. आता पत्रकारिता हा व्यवसाय झाला आहे आणि या व्यवसायाशी प्रामाणिक राहणे यात गैर काहीच नाही. नैतिकतेच्या संकल्पना बदलत चालल्याने सगळ्यांशी जुळवून घेत पत्रकारिता करावी लागेल. काळाच्या ओघात पत्रकारितेत आलेले हे बदल स्वीकारावेच लागतील, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार, नाट्य लेखक श्याम पेठकर यांनी व्यक्त केले.
गडचिरोली प्रेस क्लबतर्फे रविवारी (दि.६) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित मराठी पत्रकार दिन सोहळ्यात ‘आजच्या पत्रकारितेपुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे व ए.आर.खान मंचावर उपस्थित होते. प्रेस क्बलचे अध्यक्ष अविनाश भांडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासात योगदान दिल्याबद्दल दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा जिल्हा गौरव पुरस्काराने तर गेल्या तीन दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान देणारे लोकमतचे अहेरी तालुका प्रतिनिधी ए.आर.खान यांचा सेवाव्रती पत्रकार या सन्मानाने गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस आणि पत्रकारांच्या संबंधांवर प्रकाश टाकला. पत्रकार लोकांच्या भावना मांडत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचा अधिकार कुणाला हिरावून घेता येणार नाही, असे सांगून बलकवडे यांनी गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा ही देशभरात असलेली ओळख पुसण्याचे काम पोलीस करीत असून दिवसेंदिवस त्यात यश येत असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी पत्रकारांकडून होणारी टिका ही काम सुधारण्यासाठी चांगलीच असते. पत्रकारांच्या टिकेचे वाईट न वाटून घेता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे असे सांगितले. याप्रसंगी प्रशांत दैठणकर व अविनाश भांडेकर यांनीही संबोधित केले.
कार्यक्र माला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन जयंत निमगडे, प्रास्ताविक मनोज ताजने, पाहुण्यांचा परिचय नंदकिशोर काथवटे यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे सदस्य सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश सरोदे, शेमदेव चाफले, विलास दशमुखे, सुरेश नगराळे, रु पराज वाकोडे, नीलेश पटले, मारोतराव मेश्राम आदींनी सहकार्य केले.
जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव जपावे- मुनघाटे
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे म्हणाले की, आपल्या जडणघडणीत वडील गो.ना.मुनघाटे व दंडकारण्य परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. आदिवासी माणूस शिकला पाहिजे म्हणून वडिलांनी त्या काळात कुरखेड्यात महाविद्यालय सुरु केले. आज या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्यावर पोहोचल्याचे पाहून वडिलांचा उद्देश सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. जिल्ह्याला झाडीपट्टी रंगभूमीची समृद्ध परंपरा आहे, अभिरु ची असलेला रसिक आहे. जिल्ह्याचे हे सांस्कृतिक वैभव कमी होऊ नये, ते जपावे, वाढावे यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून येथील कलावंतांची ओळख राज्यभर व्हावी यासाठी पत्रकारांशी त्यांची योग्य दखल घ्यावी, असे आवाहन डॉ.मुनघाटे यांनी केले. याप्रसंगी ए.आर.खान यांनी दुर्गम भागातील पत्रकारितेचे अनुभव विशद केले. लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांनी सोपविलेली जबाबदारी सांभाळताना अहेरी तालुक्यातून अनेक चांगले पत्रकार घडविण्याचे अभिमानाने सांगितले.