जिल्ह्यात पेट्रोलने केली नव्वदी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:20 AM2018-09-19T01:20:09+5:302018-09-19T01:20:43+5:30
मागील १५ दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. मंगळवारी पेट्रोलने उच्चांक गाठत नव्वदी पार केली आहे. पेट्रोल व डिझेल किमतीचे दर दिवशी उच्चांक गाठत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. मंगळवारी पेट्रोलने उच्चांक गाठत नव्वदी पार केली आहे. पेट्रोल व डिझेल किमतीचे दर दिवशी उच्चांक गाठत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे.
केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलवरील अनुदान पूर्णपणे बंद करून किमतीवरील नियंत्रण सुध्दा हटविले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात येणाऱ्या चढाव-उतारानुसार दररोज किंमती बदलत आहेत. मागील १५ दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. १५ दिवसांपूर्वी ८६ रूपयांच्या जवळपास असलेल्या पेट्रोलने मंगळवारी नव्वदी पार केली. गडचिरोलीसह जिल्हाभरातील सर्वच पेट्रोलपंपावर पेट्रोल ९० रूपयांपेक्षा अधिक दराने विकला जात होता. दरदिवशी वाढणाºया पेट्रोलच्या किमतीमुळे वाहनधारक चांगलेच अडचणीत आले आहेत. वाढलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीबाबत व्हॉटस्अॅप व इतर सोशलमीडियावर गमतीदार व्हिडीओ, फोटो, मेसेज फिरत आहेत. महागाईमुळे आधीच होरपडून निघालेल्या जनतेची आणखी हाल होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ट्रॅक्टरची संख्या अधिक आहे. डिझेलचे भाव वाढल्याचे कारण पुढे करून ट्रॅक्टरच्या भाड्यात वाढ केली जात आहे.
मुलचेरातील मेडिकलमध्ये सुध्दा मिळते पेट्रोल
पेट्रोलपंप नसलेला मुलचेरा हा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव तालुका असावा, असा अंदाज आहे. पेट्रोल नसल्याने अवैध पेट्रोल विक्रेत्यांचे धंदे जोमात सुरू आहेत. किराणा दुकानाबरोबरच येथील मेडिकल मध्ये सुध्दा पेट्रोलची विक्री केली जाते. अवैध पेट्रोल विक्रेते मुलचेरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आष्टी येथून दर दिवशी कॅनच्या सहाय्याने पेट्रोल सकाळीच पेट्रोल आणतात. सदर पेट्रोल १०० रूपये दराने विकल्या जातो. मुलचेरा येथे पेट्रोलपंप असणे आवश्यक आहे. मात्र यासाठी पाठपुरावा होत नसल्याने पेट्रोल पंपाची मागणी अजूनही पूर्ण झाली नाही. परिणामी वाहनधारकांना नायलाजास्तव अधिकची किमत देऊन पेट्रोल खरेदी करावे लागत आहे.