पेट्राेल चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:31+5:302021-03-04T05:09:31+5:30
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल चोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक ...
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल चोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच कॉम्प्लेक्स मधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
स्वच्छता अभियानात हवी गतिमानता
देसाईगंज : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, त्यामध्ये गती नसल्याने लोकसहभाग दिसून येत नाही. नाल्या, रस्ते व सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने जागृती अभियान राबविण्याची मागणी आहे.
शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्या
आरमाेरी : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचविली जात नाही़ परिणामी, पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास योग्य माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
टंचाईग्रस्त गावाचे सर्वेक्षण करावे
चामाेर्शी : तालुक्यातील काही गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने महिला चिंताग्रस्त आहेत. जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पारंपरिक जलस्रोतांची निगा राखण्यासाठी संबंधित विभागाने आराखडा तयार करावा.
प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला
गडचिराेली : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
बीपीएल यादीचे सर्वेक्षण करावे
धानाेरा : गोरगरिबांना धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बीपीएल धारकांची यादी करण्यात आली आहे. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी सधन कुटुंबाचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक योजना कागदोपत्रीच असल्याने गरजू नागरिक विकासापासून वंचित आहेत.
निधी अभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
कुरखेडा : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्याचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी सरपंचांनी केली.
ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालावा
काेरची : नागरी वसाहतीमध्ये जड वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यावरही अवजड वाहने नेण्यात येत असल्याने या रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा
वैरागड : तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र सद्यस्थितीत या समित्या थंडबस्त्यात असल्याने वाद वाढत आहे.
नवीन वस्त्यात रानडुकरांचा शिरकाव
सिराेंचा : शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
लघु व्यावसायिक आर्थिक संकटात
चामाेर्शी : शहरात शेकडो लघु व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे यावर्षी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लघु व्यवसाय करणाऱ्यांची दैनंदिन आवक रोजच्या आर्थिक घडामोडीवर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवहार डबघाईस आले आहेत.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
काेरची : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठराविक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने, अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
व्यावसायिकांकडून वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हात ठेवल्याची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. याठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या, अशी मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे.