विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्राेल महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 05:00 AM2021-08-01T05:00:00+5:302021-08-01T05:00:32+5:30

पेट्राेल व डिझेलचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे विमानाचे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर विमानाच्या इंधनावर लावले जात नाहीत. त्यामुळे विमानाचे इंधन ट्रकसारख्या वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. 

Petrol is more expensive than jet fuel | विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्राेल महाग

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्राेल महाग

Next
ठळक मुद्देवाहन चालविणे कसे परवडणार?, पेट्राेल १०८.५० रुपये तर एटीएफ ६६.०६ रुपये

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दैनंदिन वाहतुकीसाठी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षा आकाशात भरारी घेण्यासाठी विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाचे (एटीएफ) भाव कमी आहेत, असे सांगितले तर कुणालाही विश्वास बसणार नाही ! पण हे खरे आहे.
पेट्राेल व डिझेलचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे विमानाचे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर विमानाच्या इंधनावर लावले जात नाहीत. त्यामुळे विमानाचे इंधन ट्रकसारख्या वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. 
गडचिराेलीत पेट्रोलचा भाव प्रतिलीटर १०८.५० रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलीटर ९६.६६ रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ इंधनाचा भाव मात्र प्रतिलीटर ६६.०६ रुपये आहे. विमानाला लागणाऱ्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर लागू असलेला ‘सेस’ (उपकर) विमानाच्या इंधनावर नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लाेकमतला सांगितले. 
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला कृषी अधिभारही विमानाच्या इंधनावर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे डिझेलच्या प्रतिलीटर किमतीपेक्षा विमानाचे प्रतिलीटर इंधन सुमारे ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याचे दिसून येते. 
विमानाचे इंधन अतिशय ज्वलनशील राहते. त्यामुळे त्याचा दर पेट्राेलपेक्षा अधिक असावा, असा समज हाेता. मात्र शासनाकडून करामध्ये सूट दिल्याने विमानाच्या इंधनाचा दर पेट्राेलपेक्षाही कमी आहे.

पगार कमी, खर्चात वाढ
काेराेनामुळे कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यामुळे काही कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. काही माेजक्याच कामगारांना कामावर ठेवण्यात आले आहे. त्यातच मजुरीतही कपात केली आहे. पूर्वी दिवसाला ४०० रुपये मजुरी मिळत हाेती. आता केवळ ३५० रुपये दिले जातात. काेराेनाच्या कालावधीत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ये-जा करण्याचा खर्चही वाढला आहे.  
- संदीप डाेईजड, वाहनधारक

स्वत:च्या वाहनामुळे प्रवासाचा खर्च वाढला
पूर्वी बहुतांश नागरिक सार्वजनिक वाहनांचाच वापर करीत हाेते. गडचिराेली शहरातील बहुतांश नागरिक विविध कामांसाठी नागपूर किंवा चंद्रपूर येथे जातात. काेराेनाच्या पूर्वी एसटी बस किंवा खासगी बसनेच जात हाेते. मात्र, आता या  वाहनातून प्रवास केल्यास काेराेना संसर्गाची भीती असल्याने नागरिक स्वत:चे चारचाकी वाहन घेऊन जातात किंवा स्वतंत्र चारचाकी वाहन भाड्याने घेतात. एसटी बसने दाेन जणांना नागपूरला जाऊन परत येण्याचा खर्च केवळ एक हजार रुपये येते. आता स्वतंत्र वाहनासाठी पाच हजार रुपये माेजावे लागतात. काही जणांनी तर काेराेनाच्या भितीने चारचाकी वाहने खरेदी केली आहेत.

 

Web Title: Petrol is more expensive than jet fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.