पेट्रोल दरवाढ हे काँग्रेसचेच पाप; रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:15 PM2018-10-27T18:15:10+5:302018-10-27T18:15:36+5:30

पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

Petrol price hike is Congress's sin; Raosaheb Danwey | पेट्रोल दरवाढ हे काँग्रेसचेच पाप; रावसाहेब दानवे

पेट्रोल दरवाढ हे काँग्रेसचेच पाप; रावसाहेब दानवे

Next
ठळक मुद्देयुतीसाठी शिवसेनेसोबत बोलणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सततच्या पेट्रोल दरवाढीने सामान्य लोकच नाही तर आम्हीसुद्धा त्रस्त आहोत. आम्ही संवेदनशिल असल्यामुळे आम्हालाही त्याची झळ जाणवते. पण ही दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
सर्व लोकसभा मतदार संघात बुथ प्रमुखांच्या नियुक्तीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या दानवे यांनी शनिवारी (दि.२७) गडचिरोलीत पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती दिली. यावेळी खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ. कीर्तीकुमार भांगडिया, नगराध्यक्ष योगिता पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी दानवे म्हणाले, निवडणुकीसाठी राज्यात ९१ हजार ४०० बूथ आहेत. त्यापैकी ८८ हजार बूथ प्रमुखांची नेमणूक भाजपने केली आहे. त्यातील ८३ हजार प्रमुखांशी प्रत्यक्ष फोनवर बोलून त्यांच्या नियुक्तीची खात्री झाली आहे. प्रत्येकी १० ते १२ घरे सांभाळणारे ७५०० कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा मतदार संघात तयार केले जात आहे. याशिवाय पूर्णवेळ विस्तारक सक्रिय आहेत. अनेक वर्षेपर्यंत तिसऱ्या-चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भाजपला २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश मोदींमुळे मिळाले हे खरे असले तरी मोदी हे भाजपपासून वेगळे नाहीत. त्यामुळे हे यश भाजपचेच आहे. २०१९ च्या निवडणुकीतही असेच यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याने युती होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र युतीसंदर्भात कोणते निकष राहील हे उघड करण्यास दानवे यांनी नकार दिला. त्या निकषांबद्दल आम्ही त्यांच्याशीच चर्चा करणार असून आमचे आतून बोलणे सुरू असते, असेही दानवे म्हणाले.

दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढू शकते
सध्या जाहीर केलेली दुष्काळसदृश तालुक्यांची संख्या ही नजरअंदाज पैसेवारीवर जाहीर केली आहे. पीकांची परिस्थिती वाईट असणारे अनेक तालुके त्यातून सुटले आहेत. मात्र पुढे दुसऱ्या टप्प्यात तेही तालुके दुष्काळसदृश म्हणून जाहीर होऊ शकतात, अशी माहिती यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिली.

Web Title: Petrol price hike is Congress's sin; Raosaheb Danwey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.