पेट्राेल विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:35 AM2021-01-20T04:35:36+5:302021-01-20T04:35:36+5:30

गडचिरोली : मुरमाडी, रानखेडा, बेलगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार ...

Petrol sales | पेट्राेल विक्री

पेट्राेल विक्री

Next

गडचिरोली : मुरमाडी, रानखेडा, बेलगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेवून ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून लीटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.

गंजलेले खांब धाेक्याचे

वैरागड : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. गंजलेल्या वीज खांबाजवळ मुले खेळत असतात.

सोनसरीत भ्रमणध्वनी सेवा कुचकामी

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे सरल प्रणालीचे ऑनलाईन काम प्रभावित झाले आहे.

लाईनमनची पदे भरण्याची मागणी

एटापल्ली : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत. त्यामुळे लाईनमनची पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.

कुरखेड्यात टिल्लू पंपांचा वापर

कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

दत्तमंदिरात सुविधा द्या

आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून, मंदिर परिसरात सोयीसुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

अंतर्गत रस्ते खड्डेमय

देसाईगंज : शहरातील पेट्रोल पंप ते हनुमान वाॅर्डातील साई मंदिरापर्यंत अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे पादचारी तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातदेखील घडू शकतो. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुग्ध योजना राबवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुग्ध याेजना राबवावी.

वास्तूची दुरूस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

बायोगॅस अनुदान ताेकडे

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्याच प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग होणे आवश्यक आहे.

पशुखाद्य महागले

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावरे सुदृढ राहून दुध जास्त देतात. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त आहेत. पशुखाद्य महागल्याचा फटका बसत आहे.

Web Title: Petrol sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.