शारीरिक अंतर तारक, तर भावनिक अंतर ठरू शकते मारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:58+5:30
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सामाजिक जीवन बदलून टाकणाऱ्या कोरोना विषाणुची पावले आता सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही पडली आहेत. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. गडचिरोलीच्या रानावनात फिरणाºया कणखर नागरिकांना कोरोनाचा विषाणू सहजपणे आपल्या कवेत घेणे शक्य नाही, मात्र कोरोनाच्या भितीपोटी शारीरिक अंतरासोबत ठेवले जात असलेले भावनिक अंतर सामान्य नागरिकालाही रुग्ण बनविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. मात्र विलगिकरण कक्षात ठेवलेले लोक जणूकाही कोरोनाबाधित रुग्णच आहेत आणि त्यांना कोरोना झाला म्हणजे त्यांनी काहीतरी अपराध केला आहे, अशा भावनेतून त्यांच्याकडे लोक पाहात आहेत. विशेष म्हणजे विलगिकरण कक्षात किंवा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेले लोक स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर निश्चिंतपणे घरी जातात. पण संशयमुक्त झाल्यानंतरही लोक त्यांच्यापासून अंतर ठेवून वागत आहेत. ही बाब अनेकांना कोड्यात टाकत आहे.
विषाणूची बाधा होऊ नये म्हणून एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवण्याचा नियम पाळण्याची सवय आता पुढील अनेक महिने सर्वांनाच करावी लागणार आहे. मात्र हे करताना एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, आपलेपणा, माणुसकी कमी झाल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाहेर जिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजूरवर्गासह अनेकांना गावात घेण्यासही लोक तयार होत नव्हते. यासाठी आरोग्य विभागाला योग्य ती जनजागृती करावी लागणार आहे.
त्यांना हवी होम क्वॉरंटाईनची मुभा
जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७३५ लोक संस्थात्मक विलगिकरणात आहेत. ज्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विलगिकरण कक्षात आणून १४ दिवस ठेवले जात आहे. रुग्णसंख्या वाढल्यास विलगिकरण कक्षासाठी शाळा-वसतिगृहे कमी पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना, जर त्यांच्या निवासस्थानी विलगिकरण कक्षाप्रमाणे स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह आणि इतरांचा संपर्क येणार नाही अशी व्यवस्था असेल तर गृह विलगिकरणाची मुभा देणे गरजेचे आहे. यामुळे शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन संबंधित व्यक्तीलाही विलगिकरण कक्षातील वातावरणामुळे होणारा रुग्णासारखा आभास होणार नाही.
मायेच्या उपचारातून मिळते सकारात्मक ऊर्जा
अनेक ठिकाणच्या विलगिकरण कक्षात ५ ते १० जणांसाठी एकच शौचालय, स्रानगृह आहे. शिवाय जेवणासाठी डबा आणून देणाºया लोकांचा एखाद्या बाधित व्यक्तीशी संपर्क येऊन त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याऊलट घरी विलगिकरणाची पुरेशी सोय असणाºयांना ती मुभा दिल्यास कौटुंबिय मायेतून संबंधित व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळून ती व्यक्ती ठणठणीत राहू शकते. याचा आरोग्य प्रशासनाने गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.