शारीरिक, मैदानी चाचणीस प्रारंभ
By admin | Published: March 23, 2017 12:50 AM2017-03-23T00:50:34+5:302017-03-23T00:50:34+5:30
लीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे.
पोलीस भरती प्रक्रिया : शिपायांच्या १६९ पदांसाठी राज्यभरातून २८ हजार उमेदवारांचे अर्ज
गडचिरोली : पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून आॅनलाईन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीस बुधवारपासून जिल्हा मुख्यालयाच्या कवायत मैदानावर प्रारंभ झाला आहे. पोलीस विभागाने बोलविल्यानुसार पहिल्या दिवशी बुधवारला जवळपास दीड हजार उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली.
१६९ पदांसाठी गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून मुले/मुली मिळून एकूण २८ हजार उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. २४ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सदर भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकरित्या घेण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रियेत रेडीओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफेकशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे १०० मीटर व १६०० मीटर धावण्याच्या प्रक्रियेची वेळ अचूक टिपण्यास मदत होत आहे. सदर पोलीस भरती प्रक्रिया सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवशी दीड हजार उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले.या सर्व उमेदवारांची दौड, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी, पुलप्स आदी बाबतची चाचणी घेण्यात आली. तिसऱ्या दिवशी शुक्रवारपासून दररोज तीन हजार उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बोलविण्यात येणार आहे. सदर शारीरिक चाचणीची प्रक्रिया १० ते १२ दिवस चालणार आहे.
विशेष म्हणजे सुरुवातीला पुरूष उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत असून शेवटच्या टप्प्यात महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. एकूण १६९ पदांपैकी १२० जागा खुल्या प्रवर्गासाठी या भरती प्रक्रियेत आरक्षित आहेत. त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातूनच आपले आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणीस पहिल्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्याबाहेरील अनेक उमेदवारांनी दोन दिवसांपूर्वीच गडचिरोली मुख्यालय गाठले. आपापल्या सोयीनुसार उमेदवारांनी गडचिरोलीत मुक्काम ठोकला. प्रत्येक वर्षीच्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गडचिरोली शहरात संपूर्ण राज्यभरातून पुरूष व महिला उमेदवारांचे जत्थे मोठ्या प्रमाणात दाखल होतात. कोणत्याही उमेदवारांनी भरती प्रक्रियेदरम्यान कसल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये, जर उमेदवारास कोणी कसल्याही प्रकारचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न करीत असल्यास संबंधित उमेदवाराने गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस भरती हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
बुधवारी पहिल्या दिवशी पहाटे ४ वाजताच उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजेरी लावली. त्यापूर्वीच पोलीस अधिकारी व कर्मचारीही तैनात झाले होते. पहाटे ४ वाजतापासूनच शारीरिक चाचणीस सुरुवात करण्यात आली. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने प्रवेशद्वारावरच उमेदवारांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात होती. दरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांनी दिल्या भरती प्रक्रियेबाबत सूचना
पोलीस भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या दिवसापासून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख या भरती प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शारीरिक चाचणीच्या पहिल्या दिवशी बुधवारला पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भरती प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्वत: शारीरिक चाचणीच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली. सदर भरती प्रक्रियेदरम्यान आॅनलाईन रजिस्टेशन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्यरित्या होत आहे काय, याची माहिती जाणून घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक उपस्थित होते.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
यंदा प्रथमच उमेदवारांच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे आॅनलाईन रजिस्टेशन करण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये होत आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.