तो खड्डा अजूनही ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:39 PM2019-06-09T23:39:53+5:302019-06-09T23:41:53+5:30
कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. या स्फोटानंतर पडलेल्या खड्ड्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. खड्ड्यावर टाकलेली गिट्टी व माती निघून जात असल्याने पुन्हा मोठा खड्डा पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. या स्फोटानंतर पडलेल्या खड्ड्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. खड्ड्यावर टाकलेली गिट्टी व माती निघून जात असल्याने पुन्हा मोठा खड्डा पडत आहे. सदर खड्डा रात्रीच्या सुमारास लक्षात येत नसल्याने वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
पुलाच्या खालच्या बाजूस नक्षल्यांनी भूसुरूंग लावला होता. भूसुरूंग स्फोटानंतर पूल व डांबरी रोड यांच्या दरम्यान पाच ते सहा फुटाचा खड्डा पडला. या खड्ड्यामुळे या मार्गावरील वाहतूक घटनेनंतर तीन दिवस बंद होती. बांधकाम विभागाने तीन दिवसानंतर सदर खड्ड्याची डागडुजी केली. मात्र दिवसेंदिवस खड्ड्यावर टाकलेली गिट्टी, माती व सिमेंट निघत आहे. त्यामुळे खड्डा पूर्ववत होत चालला आहे. कुरखेडा-पुराडा हा मुख्य मार्ग असल्याने रात्रंदिवस या ठिकाणावरून वाहनांची वाहतूक सुरू राहते. रात्रीच्या सुमारास सदर खड्डा लक्षात येत नाही. एकदम उंच डांबर आहे. त्यामुळे वाहन खड्ड्यात जाऊन डांबरवर चढताना वर उसळून अपघात होत आहे. विशेष करून रात्रीच्या सुमारास अपघात वाढले आहेत.
२० मे रोजी याच खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात होऊन कुरखेडा येथील दिलीप संघेल यांचा मृत्यू झाला. तर मैनाबाई पुडो ही गंभीररित्या जखमी झाली. पुन्हा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी खड्डा दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.