वाकडी-बोरी मार्गावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:25 AM2021-06-11T04:25:09+5:302021-06-11T04:25:09+5:30
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे.
तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. शहरालगत माेठा तलाव आहे. सदर तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास नागरिकांसाठी विरंगुळ्याचे साधन निर्माण हाेईल, त्यामुळे तलावाचे साैंदर्यीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे.
सिरोंचा भागात अवैध वृक्षतोड सुरूच
भामरागड : तालुक्यात जंगलातून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून तेलंगणा राज्यात तस्करी केली जाते. विशेष म्हणजे, वन कर्मचाऱ्यांनी अनेकदा तस्करांवर कारवाई केली आहे, परंतु रात्रीच्या सुमारास चाेरट्या मार्गाने तस्करी होत आहे.
औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते, याचा थांगपत्ता नाही.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
भामरागड : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौर दिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. कियर, बेजूरसह अन्य गावातील सौर दिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
नूतनीकरणाची प्रतीक्षा
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगाव पर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.
कुटुंब नियोजनाची गरज
मुलचेरा : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजन महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृतीची गरज आहे. पुरुषांमध्ये नसबंदी बाबत गैरसमज आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे शेण पडून राहते.
अपघात वाढले
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर भेंडाळाच्या बसस्थानकावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी वाहने भरधाव वेगाने जातात. मात्र, याठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. माेठे गाव असतानाही बसस्थानक नसल्याने अपघात वाढले आहेत.
अंतर्गत रस्ते खड्डेमय
देसाईगंज : शहरातील पेट्रोल पंप ते हनुमान वाॅर्डातील साई मंदिरापर्यंत अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे पादचारी तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघात देखील घडू शकतो. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जळाऊ लाकडाचा तुटवडा
कोरची : येथे विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी वास्तव्य करतात, परंतु त्यांना वेळेवर जळाऊ लाकडे उपलब्ध होत नाही. स्थानिक नागरिकांना वनविभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत आहे. बहुतांश डेपोवर जळाऊ लाकडाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सुरक्षा कवच विना डीपी
कुरुड : देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. कोकडी, तुळशी, विसोरा, विहिरगाव आदी भागात ही समस्या आहे. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमध्ये होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुग्ध योजना राबवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दूध विक्रीसाठी अडचण आहे.
कार्यालये पडली ओस
गडचिराेली : येथील पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या कार्यालयात अत्यल्प कर्मचारी दिसून येत आहेत. जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यालयातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने अनेक कर्मचारी शुक्रवारीच कार्यालय साेडतात. त्यानंतर साेमवारीच कार्यालयात हजर हाेतात.
कोडसेपल्लीत समस्या
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. गावात मूलभूत साेयी-सुविधा पुरवून रस्ते व नालीचे बांधकाम करावे.
जाचक अटी रद्द करा
गडचिरोली : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वन जमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वन हक्काच्या पट्ट्यांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनहक्क पट्टे निकाली काढावे.
मोबाईल सेवा कुचकामी
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे ऑनलाईन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. याभागात ग्राहक माेबाईल इंटरनेटचा वापर करतात.