तस्करीला राेखण्यासाठी रेती घाटावर खोदले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:21+5:302021-05-23T04:36:21+5:30
देसाईगंजवरून ८ किमी अंतरावरील कोंढाळा वैनगंगा नदीपात्रातून महसूल विभागाने रेती चोरीस जाऊ नये, रेती घाटावर व नदीपात्रात ट्रॅक्टर ...
देसाईगंजवरून ८ किमी अंतरावरील कोंढाळा वैनगंगा नदीपात्रातून महसूल विभागाने रेती चोरीस जाऊ नये, रेती घाटावर व नदीपात्रात ट्रॅक्टर नेता येऊ नये म्हणून खड्डे खोदून ठेवण्यात आले. खोदलेले खड्डे रेती चोरट्यांनी बुजविले व दीड महिन्यामध्ये लाखो रुपयांची रेती लंपास केली. अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे व इतर साधनांद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याने महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. हा प्रकार महसूल विभागाला लक्षात येताच प्रशासनाकडून पुन्हा खड्डे करण्यात आले.
देसाईगंज तालुक्यातील नदीघाटांचे दरवर्षी लिलाव होऊन लाखाे, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सध्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टरने व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती चोर मालामाल होत आहेत. काही अंतरावर गावानजीकच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत होते. अवैध रेतीच्या उपशामुळे नदी पात्र खोलगट स्तरापर्यंत पोहोचले आहेत.रेती तस्करीला कसा आळा घालता येईल यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अखेर प्रशासनाने कोंढाळा रेती घाटावर खड्डे खोदले. घाटावर ट्रॅक्टर जाणार नाही याची प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे .