पाण्याची योग्य विल्हेवाट लावा, नाहीतर मार्गक्रमणासाठी डोंगा द्या
By admin | Published: July 1, 2016 01:25 AM2016-07-01T01:25:36+5:302016-07-01T01:25:36+5:30
पावसाळ्यात आठवडी बाजार परिसरातील पूर्ण पाणी गायत्रीनगरात वाहत येते. या पाण्याची दिशा थेट गायत्रीनगराच्या
चप्पल-बुटांसह घाणपाणी शिरते घरात : गायत्रीनगरवासीयांचा सवाल
पावसाळ्यात आठवडी बाजार परिसरातील पूर्ण पाणी गायत्रीनगरात वाहत येते. या पाण्याची दिशा थेट गायत्रीनगराच्या केंद्रबिंदूत असल्याने तसेच चढत्या भागाकडे नालीचे बांधकाम केल्यामुळे पाणी थेट नालीतून वाहत न जाता नागरिकांच्या घरात शिरते. आठवडी बाजार व दुकानलाईन परिसरातील चप्पल-बुट व प्लास्टिक घनकचरा वाहून आणलेले पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. हा कचरा काढतानाच नागरिकांच्या नाकीनऊ येत असते. हा त्रास नागरिकांना केवळ पावसाळ्यातच सहन करावा लागत नाही तर ऐरवी दिवसातही आठवडी बाजार तसेच दुकानलाईन परिसरातील घनकचरा सांडपाण्यासह वाहत येत असते. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नालीची दिशा बदलावी पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अथवा पावसाळ्यात आवागमनासाठी नागरिकांना नगर परिषदेने डोंगा द्यावा, असा उद्विग्न सवाल गायत्रीनगरातील नागरिकांनी गुरूवारी नगर परिषद प्रशासनाला केला.
अधिकारी म्हणतात, तुमचा ले-आऊट चुकीचा!
१६ ते १७ वर्षांपासून गायत्रीनगर वसलेले आहे. सध्या येथे ३० घरांची वस्ती आहे. परंतु जेव्हा येथील समस्या मांडण्याकरिता प्रशासनदरबारी नागरिक जातात व त्यानंतर स्थानिक प्रशासनातील अधिकारी चौकशीकरिता येतात, तेव्हा अधिकारी नागरिकांना तुमचा ले-आऊटच चुकीचा आहे, असे सांगून समस्या सोडविण्याची मागणी झिडकारून लावतात. अकृषक केलेले प्लॉटचे ले-आऊट कसे चुकीचे राहणार, अशी भावना येथील नागरिकांनी लोकमत चमूजवळ व्यक्त केली. गायत्रीनगरातील नाल्यांचे बांधकाम करताना उतार दिशेने जाणाऱ्या नाल्या बांधणे गरजेचे होते. परंतु दक्षिणेकडे उतार न देता उत्तरेकडे उतार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी उतार भागाने वाहत न जाता थेट नागरिकांच्या अंगणात शिरते. त्यामुळे नागरिकांना आपल्या गाड्या बाहेरच ठेवाव्या लागतात. ऐरवी सुख-दु:ख वाटणारे गायत्रीनगर या समस्यांमुळे दु:खी आहे. हरबाजी मोरे यांच्या घरापासून डॉ. बिडकर - किशोर सोनटक्के - लाकडे यांच्या घरापर्यंत चौकूट रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण १७ वर्षांचा कालावधी उलटूनही झालेले नाही. शिवाय विसापूर मार्गाला जोडणारा ९ मीटर रूंदीचा रस्ता तसेच चंद्रपूर मार्गाला जोडणारा १२ मीटर रूंदीचा रस्ता मंजूर असताना सुद्धा याचे बांधकाम झाले नाही. पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे बांधकाम होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु पावसाळा सुरू होऊन सुद्धा अद्यापही काम सुरू करण्यात आले नाही. नगर परिषदेचे पदाधिकारी नागरिकांची केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप गायत्रीनगरवासीयांनी केला आहे.
रस्त्याचे काम मंजूर, मात्र डांबरीकरणाची प्रतीक्षाच!
नगर परिषदेचे संकुल - डॉ. बिडकर - दिलीप सोनटक्के ते विजय लाकडे यांच्या घरापर्यंत डांबरी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे, असे या प्रभागाचे नगरसेवक विजय गोरडवार यांनी नागरिकांना सांगितले. याशिवाय या कामाची निविदाही काढण्यात आली आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र पावसाळा सुरू होऊनही नगर पालिका प्रशासनाच्या वतीने या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे या भागातील पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत. या ठिकाणी रस्ता न झाल्यामुळे पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागतो, इतकी दयनीय अवस्था गायत्रीनगरात आहे, असे येथील नागरिक हरबाजी मोरे यांनी सांगितले.
जिन्यापर्यंत पोहोचते घाणपाणी; आटतपर्यंत करावी लागते प्रतीक्षा
पावसाळ्यात आठवडी बाजार परिसरातील पाणी काडीकचऱ्यासह गायत्रीनगरात पोहोचत असते. परंतु चुकीच्या पद्धतीने नाली बांधकाम केल्यामुळे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नाही. नगरातील किशोर सोनटक्के यांच्या घराच्या जिन्यापर्यंत पाणी पोहोचत असल्याने कुटुंबीय पाणी निघण्याची प्रतीक्षा करीत असतात. परंतु पाणी आटतपर्यंत जिन्यापर्यंत चढलेले पाणी उतरत नाही. सोनटक्के यांच्या घराजवळ लहान सिमेंट पाईप टाकण्यात आले आहे, परंतु या पाईपात पाणी अडकून असते. कुटुंबीय पाईपमध्ये बांबू टाकून पाणी वाहते करण्याचा प्रयत्न करतात. पाण्याचा उतार उंच जागेकडे असल्याने उतारावरील असलेल्या घराकडे पाण्याचा प्रवाह असतो. परिणामी अंगणात पाणी शिरत असते.