कृषी व सेवा विस्ताराचा तयार होणार आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:00 PM2019-05-06T23:00:27+5:302019-05-06T23:00:41+5:30
जिल्ह्याचा कृषी व संलग्न सेवेसाठी यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा तयार केला जाणार आहे. सदर आराखडा पुढील पाच वर्षांसाठी राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचा कृषी व संलग्न सेवेसाठी यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा तयार केला जाणार आहे. सदर आराखडा पुढील पाच वर्षांसाठी राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, मत्स्य व्यवसाय अधिकारी प्रशांत वैद्य, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.वंजारी, डॉ.बुरले, दुग्ध व्यवसाय अधिकारी सचिन यादव, रेशीम अधिकारी राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, चेतना लाटकर, बद्री, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भोसले, कृषी विकास अधिकारी कोडप, उपविभागीय कृषी अधिकारी पानसरे, तालुका कृषी अधिकारी ठाकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे पाच झोन तयार करून १५ मे पर्यंत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावे, स्थानिक उपलब्धी व तंत्रज्ञानातील त्रूटी यांचा मेळ घालावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. डॉॅ.प्रकाश पवार यांनी यथार्थदर्शी संशोधन आणि विस्तार आराखड्याचे स्वरूप, संकल्पना व पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रास सहाय्यभूत ठरेल, अशा कृषी, पशुधन, रेशीम, मत्स्य व्यवसाय, विपनन आदींचा समावेश असलेला आराखडा मे २०१९ पर्यंत होणार आहे.