आराखडा तयार मात्र बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:40 PM2017-11-12T23:40:30+5:302017-11-12T23:40:44+5:30
उन्हाळ्यात निर्माण होणारी वैरागड येथील पाणी टंचाई निवारण्यासाठी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत गोरजाई डोहावर नळ योजना प्रस्तावित असून....
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : उन्हाळ्यात निर्माण होणारी वैरागड येथील पाणी टंचाई निवारण्यासाठी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत गोरजाई डोहावर नळ योजना प्रस्तावित असून या नळ योजनेचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. मात्र मागील चार वर्षांपासून नळ योजनेचा मुहूर्त सापडत नसल्याने सदर योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वैरागड येथे ७५ हजार लिटर क्षमतेची जुनी पाणी पुरवठा योजना आहे. गावाची वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा वाढता वापर लक्षात घेऊन गोरजाई डोहावर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र जुन्याच पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर गावाच्या मध्यभागी भोयर यांच्या घराजवळ १५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र गावातील अर्ध्या अधिक नळधारकांना पाणी मिळत नाही. फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.
राष्टÑीय ग्रामीण जल योजना कार्यक्रमांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. यात विहीर खोलीकरण, पंप दुरूस्ती, नवीन पाणी पुरवठा विहीर, फिल्टर, गोरजाई डोहावर नवीन पंप, नवीन गृह पाईपलाईन यांचा समावेश आहे. योजनेच्या अधिकाºयांनी जागेसाठी अनेकदा सर्वे केला. मात्र येथील स्थानिक प्रशासनाकडून या कामासाठी पाठपुरावा होत नसल्याने नळ योजनेचे काम थंडबस्त्यात आहे. अगदी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर थातूरमातूर उपाययोजना केली जाते. मागील वर्षी केवळ खड्डा तयार करण्यासाठी एक लाख रूपयांचा खर्च केला होता. मात्र या खड्ड्याचा उपयोग झाला नाही.
आमदारांचे आश्वासन हवेत विरले
आमदार कृष्णा गजबे यांनी १६ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेऊन वैरागड येथील पाणी टंचाईवर चर्चा केली आणि गोरजाई डोहावरील नळ योजनेचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र सदर आश्वासन हवेतच विरले. वैरागडच्या या नळ योजनेच्या प्रश्नाकडे तालुका, जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.