असे आहे नियोजन भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:28 PM2018-04-16T23:28:47+5:302018-04-16T23:29:01+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अत्यंत देखणी अंतर्गत व बाह्य सजावट असणाऱ्या या इमारतीच्या उभारणीला ६ कोटी ६५ लक्ष २६ हजार रु पये खर्च आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अत्यंत देखणी अंतर्गत व बाह्य सजावट असणाऱ्या या इमारतीच्या उभारणीला ६ कोटी ६५ लक्ष २६ हजार रु पये खर्च आला आहे.
दोन मजली इमारतीचे बांधकाम एकूण ११२८.६९ चौरस मीटर आहे. यात पहिल्या मजल्यावर अद्ययावत असे १५० आसन क्षमतेचे सभागृह आहे. हे सभागृह पूर्णपणे साऊंडप्रुफ असून यात ३ प्रोजेक्टर देखील उपलब्ध करु न देण्यात आले आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर व्हीआयपी कक्ष तसेच नियोजन अधिकारी यांचे कक्ष आहेत. प्रवेश दालनात फ्लोअरिंगसाठी ग्रॅनाईटचा वापर करण्यात आला आहे. दालनात लाकडी व इतर खोल्यांमध्ये व्हिट्रीफाईड टाईल्सचा वापर करण्यात आला आहे.
या भवनातील सभागृहाचा वापर जिल्हा नियोजन समितीसह इतर विभागांच्या बैठकांसाठी वेळोवेळी करता येणार आहे. नियोजन अधिकारी, सहाय्यक नियोजन अधिकारी तसेच लेखाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र असे कक्ष या इमारतीत आहेत. याखेरीज अभ्यागतांना बसण्यासाठी सोफा आणि खुर्च्यांची व्यवस्था आहे. दिव्यांगांना सुलभ प्रवेश व वावर शक्य व्हावा यासाठी रॅम्प तसेच प्रसाधनगृहाची वेगळी व्यवस्था येथे आहे. तळमजल्यावरील क्षेत्र ६६३.६७ चौरस मीटर असून पहिल्या मजल्याचे क्षेत्र ४६५.०२ चौरस मीटर इतके आहे. मुख्य इमारतीचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ५ लक्ष ४२ हजार रुपये खर्च आला. अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणिय अशा अंतर्गत सजावटीचे काम ६ महिन्यांमध्ये पूर्ण झाले यासाठी १ कोटी ७६ लक्ष २६ हजार रुपये खर्च आला आहे.