दिवाळी संपताच ग्रामीण भागात मंडईचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:43 PM2017-10-20T23:43:00+5:302017-10-20T23:43:06+5:30

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. दंडार, तमाशा, गोंधळ या लोककला प्रकारातून झाडीपट्टी रंगभूमी जन्माला आली.

Planning of the Mandai in rural areas at the end of Diwali | दिवाळी संपताच ग्रामीण भागात मंडईचे नियोजन

दिवाळी संपताच ग्रामीण भागात मंडईचे नियोजन

Next
ठळक मुद्देझाडीपट्टी रंगभूमी सज्ज : शंकरपटावरील बंदीने हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. दंडार, तमाशा, गोंधळ या लोककला प्रकारातून झाडीपट्टी रंगभूमी जन्माला आली. इथल्या प्रेक्षकांनी झाडीपट्टी रंगभूमीला दिलेल्या कौलाने झाडीपट्टी रंगभूमी प्रगल्भ झाली असून दिवाळीची धामधूम संपताच आता मंडईला सुरुवात होणार आहे. या मंडईमध्ये झाडीपट्टी रंगभूमीची विशेष भूमिका राहणार आहे.
मनोरंजनाची साधने अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध होती. त्या कालावधीतच झाडीपट्टी रंगभूमीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले. आज टीव्ही, मोबाईल घरोघरी पोहोचला आहे. तरीही झाडीपट्टी रंगभूमीची क्रेझ कमी न होता ती वाढतच असल्याचे दिसून येत आहे. झाडीपट्टीच्या रंगभूमीचे केंद्र देसाईगंज असून त्या ठिकाणी ३० ते ४० नाट्य कंपन्या आहेत. नाटकात काम करणारे कलाकार, संगीत साथ, डेकोरेशन, लेखक, दिग्दर्शक अशा जवळपास एक हजार नागरिकांना झाडीपट्टी रंगभूमीने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. मधल्या काळात छत्तीसगडी डान्स हंगामाचे अतिक्रमण झाले. आंबट शौकिनांनी छत्तीसगडी डान्समधील अश्लिलता स्वीकारल्याने झाडीपट्टीच्या रंगभूमीवर काही काळासाठी अवकळा आली होती. मागील वर्षी डान्स हंगामाच्या नावावर तरूणींची विक्री करण्याचा प्रकारही उजेडात आला होता. संबंधितांवर कारवाई झाली होती. रंगभूमीला कलंक लावणाºया या डान्स हंगामावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे वैरागडच्या विश्व विराज सांस्कृतिक नाट्य मंडळाने केली आहे.
झाडीपट्टी रंगभूमी काही मोजक्या लोकांनी प्रामाणिक प्रयत्नांनी उभी केली आहे. यात डॉ. धनंजय नाकाडे, अ‍ॅड. परशुरामकर, परशुराम खुणे यांचा उल्लेख करता येईल. या मंडळींनी बराच काळ झाडीपट्टी रंगभूमीवर आपले वर्चस्व ठेवले होते. आरमोरीचे गणपत वडपल्लीवार, इलमलवार गुरूजी, माजी आ. वरखडे यांनीही प्रतिकूल परिस्थितीत रंगभूमी जगविली. मागील वर्षी मराठी सिनेमाचे प्रसिद्ध कलाकार मकरंद अनासपुरे यांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या तीन प्रयोगांमध्ये भूमीका केली. यापूर्वी रमेश भाटकर, अल्का कुबल यासारख्या नावाजालेल्या कलाकारांनीही झाडीपट्टीच्या रंगमंचावर आपला अनिभय सादर केला. झाडीपट्टीतला माणूस प्रचंड नाट्यवेडा आहे.
दिवसा मंडई किंवा शंकरपट, रात्री मनोरंजनासाठी नाटकाचा प्रयोग भरविला जातो. पंचक्रोशितील नागरिक याला उत्तम प्रतिसाद देतात. त्यामुळेच एका गावात एकाच रात्री चार ते पाच नाटकांचे प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केले जातात. झाडीपट्टीच्या या रंगभूमीला डान्स हंगामाची दृष्ट लागू नये, अशी अपेक्षा येथील प्रेक्षक व कलाकारांकडून केली जात आहे.

Web Title: Planning of the Mandai in rural areas at the end of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.