विहारासाठी निधी देणार
By admin | Published: March 27, 2017 12:52 AM2017-03-27T00:52:54+5:302017-03-27T00:52:54+5:30
बुद्धांचे विचार सर्व मनुष्याला शांतीचा मार्ग दाखविणारे व सर्व जगाला तारणारे आहेत. सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार अंगिकारावे.
अशोक नेते यांचे प्रतिपादन : कढोलीत भगवान बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण
कुरखेडा : बुद्धांचे विचार सर्व मनुष्याला शांतीचा मार्ग दाखविणारे व सर्व जगाला तारणारे आहेत. सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार अंगिकारावे. कढोली गावाच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीची मागणी नागरिकांनी करावी. बौद्ध विहारासाठी पाच लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा खा. अशोक नेते यांनी केली.
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे रविवारी वॉर्ड क्रमांक १- जयभीम पँथर यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रोहिदास राऊत, विजय बन्सोड, हंसराज बडोले, डी. के. मेश्राम, कृष्णा चौधरी, जावेद अली, चंद्रकांत चौके, दमयंती सहारे, माधुरी मडावी, लक्ष्मण नंदनवार, अनिल कोटांगले, मेघाजी सहारे, महादेव सहारे आदी मान्यवर उपस्थित होते. जगात अशांतता पसरली आहे. अशा या अशांत जगाला शांत करण्यासाठी गौतम बुद्धांचे विचार अत्यंत मौलिक ठरणार आहेत. गौतम बुद्धांच्या विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विजय बन्सोड व इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)