रस्त्याच्या खड्ड्यात झाले वृक्षारोपण
By admin | Published: September 17, 2015 01:39 AM2015-09-17T01:39:48+5:302015-09-17T01:39:48+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी राजनगरीतील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले.
साबांविचे लक्ष वेधले : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे आंदोलन
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी राजनगरीतील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. बांधकाम विभागाचे लक्ष या खड्ड्यांकडे वेधण्यासाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने बुधवारी अहेरीच्या विविध रस्त्यांवरील खड्ड्यात भर पावसात वृक्षारोपण करण्यात आले.
या अभिनव आंदोलनाचे नेतृत्त्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी केले. अहेरी चौक ते महागाव अहेरी स्टेट रस्त्याच्या डांबरीकणास अडीच वर्षांचा कालावधी झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातूर डागडुजीस प्रारंभ झाला. प्रत्येक वेळी मंत्री येणार असला की, डागडुजी करून काम पुढे ढकलले जाते. या मार्गावरून दररोज १५० एसटी बसेस व ३०० वर लहान-मोठी वाहने आवागमन करतात. या मुख्य मार्गावर सर्वत्र चिखल पसरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला चार वेळा अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने निवेदन देऊन रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेरीस बुधवारी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने खड्ड्यात वृक्ष लावण्याचे अभिनव आंदोलन करून बांधकाम विभागाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात रघुनाथ तलांडे, विजय अलोणे, अतुल उईके, राजू पेरगुरवार, अरूण मुक्कावार, श्रीनिवास मनबोल, अजय गोवंशी, स्वप्नील येनमवार, बालाजी झाडे, विजय निकुरे, अमजद शेख, नेहाल शेख आदी सहभागी झाले होते. बांधकाम विभागाने रस्ता दुरूस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तलांडे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)