पृथ्वी वाचविण्यासाठी वृक्षारोपण यज्ञ

By admin | Published: June 24, 2017 01:26 AM2017-06-24T01:26:11+5:302017-06-24T01:26:11+5:30

वाढत्या औद्योगिकरण व लोकसंख्येमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

Plantation of sacrifice to save the earth | पृथ्वी वाचविण्यासाठी वृक्षारोपण यज्ञ

पृथ्वी वाचविण्यासाठी वृक्षारोपण यज्ञ

Next

खासदारांचे प्रतिपादन : वन विभाग व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे वृक्षदिंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाढत्या औद्योगिकरण व लोकसंख्येमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सजीव सृष्टीला दीर्घकाळ टिकवायचे असेल तर वृक्ष लागवडीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून वृक्ष जगवावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले.
वन विभाग व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने गडचिरोली शहरातून शुक्रवारी सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार प्रा.अनिल सोले, आ.डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, मुख्य वनसंरक्षक येटबॉन, भाजप महामंत्री रवींद्र ओल्लालवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बबली मेश्राम, किशोर पाटील, विजय फडणवीस, प्रशांत कामडी, देवा डेहनकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, एक व्यक्ती एका दिवशी जो आॅक्सिजन घेतो, त्याची किंमत काढली तर ती २५ हजार रूपयांच्या जवळपास आहे. झाडांची संख्या कमी झाली तर आॅक्सिजन विकत घेण्याची पाळी येऊ शकते, आॅक्सिजन मिळाला नाही तर सजीव दोन मिनीटेही जिवंत राहू शकत नाही. आॅक्सिजन पुरवठ्यासाठी झाडे एकमेव पुरवठादार आहेत. त्यामुळे सजीव सृष्टीमध्ये झाडांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाने झाडांची लागवड करून ते जगविण्याचा प्रयत्न करणे हे स्वत:चे कर्तव्य मानले पाहिजे. झाड लावून ते जगविण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र शासन करीत आहे, असे मार्गदर्शन खा.अशोक नेते यांनी केले.
आ.प्रा.अनिल सोले म्हणाले, वृक्षदिंडी विदर्भातील सहा जिल्ह्यात काढली जाणार आहे. आज आपण वृक्षलागवड केली नाही तर येणाऱ्या काळात जीवन जगणे कठीण होऊन जाईल. पूर्वी इंधन व पाणी निसर्गातून सहज मिळत होते. परंतु वेळीच योग्य काळजी घेतली नसल्यामुळे आपल्याला ते आता खरेदी करण्याची पाळी आली आहे, असे ते म्हणाले.
आ.डॉ. देवराव होळी यांनी वृक्षदिंडी ही लोकचळवळ असल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हे ईश्वरीय कार्य आहे. शासनामार्फत १ ते ७ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात २५ लाख या उद्दिष्ट उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली जाणार आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सुनील पेंदोरकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सर्वांना वृक्ष लागवड व जगविण्याची शपथ दिली. मात्र वनविभागाने यावेळीही प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमापासून दूर ठेवले.

वनविभागाने खोदले २५ लाख खड्डे
गडचिरोली जिल्ह्याला वृक्षलागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभाग मागील दोन महिन्यांपासून कामाला लागला आहे. वन विभागाच्या मार्फत जनजागृती केली जात आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाने सुमारे २५ लाख खड्डे खोदले आहेत. १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्षलागवड केली जाईल. जिल्ह्यातील जंगल टिकून राहिले पाहिजे, यासाठी वन विभाग प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी केले. वृक्ष लागवड करू इच्छिणाऱ्या नागरिक व स्वयंसेवी संस्थांना सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिले जातील, अशीही माहिती मुख्य वनसंरक्षक येटबॉन यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.

 

Web Title: Plantation of sacrifice to save the earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.