खरिपात दोन लाख हेक्टरवर होणार धानाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:32 PM2018-04-16T23:32:50+5:302018-04-16T23:33:58+5:30
२०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान सादर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान सादर केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू उपस्थित होते.
कृषी कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये यासाठी पीक कर्ज देणे ही प्रत्येक बँकेने स्वत:ची जबाबदारी समजावी. शेतकºयांनी मागणी करताच त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.
सर्व बँकांना मिळून ८५ कोटी १७ लाख २७ हजार रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. मागील वर्षी १ लाख ८२ हजार हेक्टरवर धानाची रोवणी झाली होती. यावर्षी दोन लाख हेक्टरवर धानाची रोवणी होईल. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. सोयाबिनचे सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ६४६ हेक्टर असले तरी सोयाबिनखालील क्षेत्र कमी होत चालले आहे. मागील वर्षी केवळ ३९३ हेक्टरवर सोयाबिनची लागवड झाली होती. कापसाचे क्षेत्र मात्र वाढत चालले आहे. मागील वर्षी सुमारे १४ हजार ४६१ हेक्टरवर कापूस लावला होता. यावर्षीच्या हंगामात १५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची शक्यता आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा तालुक्यामधील ५० गावांमधील २९६ आदिवासी कुटुंबांना परसबाग योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी बैठकीत सादरीकरण केले. तर आत्मातर्फे डॉ. प्रकाश पवार यांनी विविध प्रयोगांची माहिती दिली.
२८ हजार हेक्टर क्विंटल बियाणे लागणार
दोन लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड होणार आहे. यासाठी २६ हजार ७४० क्विंटल धानचे बियाणे लागणार आहेत. सोयाबिन ३०० क्विंटल, तूर ३५० क्विंटल, बिटी कापूस २०२ क्विंटल, मका १४५ क्विंटल, उडीद तीन क्विंटल या प्रमाणे एकूण २७ हजार ७५५ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे.
३८८ लाभार्थ्यांना ट्रॅक्टर
कृषी विभागाच्या उन्नत शेती समृध्द शेतकरी या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ३८८ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर ४ कोटी २९ लाख २० हजार रूपये खर्च झाले आहेत. याशिवाय रोटोव्हेटर, दालमिल सुध्दा देण्यात आली आहे.
५४ शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांचा विमा दिला जातो. मागील तीन वर्षात या योजनेंतर्गत १२६ प्रस्ताव कंपनीकडे पाठविले होते. त्यापैकी ५४ प्रस्ताव मंजूर होऊन विम्याची रक्कम देण्यात आली. १७ प्रस्ताव नामंजूर केले असून ३६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. वारसदारांकडे १९ प्रस्ताव प्रलंबित आहे, अशी माहिती देण्यात आली.