झाडीपट्टीतील बहुपयोगी वनस्पती कुडा
By admin | Published: May 27, 2014 12:52 AM2014-05-27T00:52:24+5:302014-05-27T00:52:24+5:30
जंगलव्याप्त असलेल्या पूर्व विदर्भात अनेक जातीच्या वृक्षांचा समावेश होतो. आयुर्वेदात महत्वपूर्ण मानल्या जाणार्या अनेक औषधी वनस्पती पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आढळतात.
गोपाल लाजूरकर - गडचिरोली
जंगलव्याप्त असलेल्या पूर्व विदर्भात अनेक जातीच्या वृक्षांचा समावेश होतो. आयुर्वेदात महत्वपूर्ण मानल्या जाणार्या अनेक औषधी वनस्पती पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आढळतात. जंगलात आढळणार्या अनेक औषधी वनस्पतींविषयीचा आजारांवरील वापर अनभिज्ञ असल्याने जिल्ह्यातील औषधी वनस्पती दुर्लक्षितच आहेत. जिल्ह्यात हिरडा, बेहडा, आवळा या फळवर्गीय वनस्पतींसह कुडा नावाची वनस्पतीही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जंगलात सर्वत्र आढळते. कुडा वनस्पतीचा आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून वापर होतो. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कुड्यांच्या फुलांची भाजी तयार करून खात असतात. कुडा या वनस्पतीस भाषेनुसार अनेक नावे आहेत. संस्कृतमध्ये या वनस्पतीस कुटज, गुजरातीत इंदरजव, हिंदीत कोरैया तर इंग्रजीत बिटर ओरीएंडर असे अनेक नावे आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच कुड्याच्या झाडांना फुले यायला सुरूवात होते. ५ फुटापासून २० फुटापर्यंत उंच असलेली अनेक झाडे जिल्ह्याच्या जंगलात आढळतात. विशेषत: झुडपी जंगलामध्ये कुड्याची झाडे सर्वात जास्त आढळून येतात. त्यामुळे ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांची भाजी म्हणून सर्वात जास्त वापर उन्हाळ्यात नागरिक करीत असतात. प्रत्येक झुडपास फ ांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेली पांढर्या रंगाची फुले असलेले गुच्छ येतात. पोळ्याच्या सणादरम्यान कुड्याच्या झाडांना लांबट शेंगा जोडीने येतात. पोळ्याच्या दिवशी कुड्याच्या शेंगांची भाजी खास बैलांना शेतकरी कुड्याच्या पानांच्या पत्रावळीत खाऊ घालतात. त्यामुळे पोळ्याच्या सणाला कुड्याच्या झाडाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुडा ही वनस्पती महाराष्टÑातील कोकण भागासह विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळते. करड्या रंगाच्या सालीचे हे झाड असते. कुड्याच्या बियांची चव कडू व तुरट असते. औषधी म्हणून मुळाची साल व बियांचा सर्वाधिक वापर होतो. रसशास्त्रातही कुड्याला महत्व आहे. पांढर्या फुलांमध्ये एक कडू द्रव्य असते. कुड्यांच्या बियातही तेल व कणीदार कडू द्रव्य असते. फेब्रुवारी महिन्यापासून कुड्याच्या झाडांना फुले येण्यास सुरूवात होते त्यामुळे पांढर्या फुलांच्या गुच्छांनी झाड बहरले असते. कुड्यात कोनेसीडीन, कोनेशिमाईन, कोनीणाईन, होलेरीन, कुर्चीन, प्रोटीन आदी रासायनिक घटक वृक्षाच्या विविध भागात आढळतात. एकूणच कुड्याचे मुळ, खोड, पान, फुल, फळ आणि बिया बहुपयोगी असतात. बहुगुणी कुड्यामुळे वृक्षाची लागवड शेती, बांध रस्त्याच्या दुतर्फा व बगीच्यांमध्ये केली जाते.