प्लॅटिनमची हेमानी जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:49 PM2018-06-08T23:49:29+5:302018-06-08T23:49:29+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या पहिल्या ३ क्रमांकात ४ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या पहिल्या ३ क्रमांकात ४ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. गडचिरोली शहरातील प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या मार्टिना मन्सूर हेमानी हिने ९६.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. यासोबतच जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक याच शाळेच्या संस्कृती दासरवार आणि सृष्टी दुधबावरे (९५.८० टक्के) यांनी तर तृतीय क्रमांक प्लॅटिनमचीच मिनाक्षी परतानी आणि शिवाजी विद्यालयाचा प्रशांत दिवाकर पिपरे (९५.६०) यांनी पटकावला आहे.
यावर्षी दहावीची परीक्षा देणारे जिल्ह्यातील ८५.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. १५ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ हजार ७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यातील १४०८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत आले आहेत. या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ८३.७८ टक्के मुले तर ८८.१६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सावित्रीच्या लेकींनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
जिल्ह्यातील ४४ शाळांमधील विद्यार्थी यावर्षी १०० टक्के उत्तीर्ण झाले आहेत तर दोन शाळांना भोपळा (शून्य टक्के निकाल) मिळाला आहे. विशेष म्हणजे १०० टक्के निकाल देणाºया शाळांमध्ये चार शासकीय मराठी आश्रमशाळा आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे संचालित एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचाही समावेश आहे.
दुपारी १ वाजता निकाल लागताच शहरातील विविध शाळांनी आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला. दुर्गम भागात मात्र अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा योग्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी ताटकळत राहावे लागले.
प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलने मारली बाजी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत प्लॅटिनम ज्युबिली शाळेने आपले वर्चस्व सिद्ध केले. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान या शाळेच्या विद्यार्थ्याने पटकावला होता. त्यानंतर दहावीतही याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावून आपले वर्चस्व कायम ठेवले. एवढेच नाही तर ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी याच शाळेचे आहेत. अनुभवी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांवर घेतली जाणारी मेहनत यामुळे हे शक्य झाल्याची भावना या शाळेचे सचिव अजिज नाथानी यांनी व्यक्त केली.
मार्टिना हेमानी प्रशासकीय सेवेत जाणार
९६.४० टक्के घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावणाºया प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या मार्टिना मन्सूर हेमानी हिला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे. मात्र तत्पूर्वी एमबीबीएस आणि एमडी करण्याचा मनोदय तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. वडील व्यापारी असले तरी गृहिणी असलेली आई उच्च शिक्षित असल्यामुळे तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले. मात्र लहान भाऊ अगदी दिड वर्षाचा असल्यामुळे दहावीचा अभ्यास करताना तिला घरी बºयाच अडचणी येत होत्या. अपेक्षित लक्ष्य गाठू शकणार की नाही या भितीने तिला ग्रासले होते. मात्र शाळेचे प्राचार्य रहीम आमलानी यांनी प्रोत्साहन देत शाळेतच अभ्यासाची सोय केली. शाळेचे वर्ग ११ ते ५ असले तरी मार्टिना सकाळी ७.३० पासून शाळेच्या वाचनालयात येऊन अभ्यास करायची. त्यामुळे पुन्हा आत्मविश्वास वाढला आणि हे यश गाठता आले. त्यामुळे माझ्या यशाचे खरे मानकरी प्राचार्य आमलानी हेच असल्याचे मार्टिनाने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.