प्लॅटिनमचा किशन परतानी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:15 PM2018-05-30T22:15:17+5:302018-05-30T22:16:08+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ८०.९८ टक्के एवढा आहे. आठ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ८५.५७ टक्के एवढा लागला होता. यावर्षी जवळपास पाच टक्क्यांनी निकाल घटला आहे. नागपूर विभागातून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Platinum's Kishan Partani is the best in the district | प्लॅटिनमचा किशन परतानी जिल्ह्यात अव्वल

प्लॅटिनमचा किशन परतानी जिल्ह्यात अव्वल

Next
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ८०.९८ टक्के : गेल्यावर्षीच्या तुलनेत माघारला, एटापल्ली तालुका आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ८०.९८ टक्के एवढा आहे. आठ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ८५.५७ टक्के एवढा लागला होता. यावर्षी जवळपास पाच टक्क्यांनी निकाल घटला आहे. नागपूर विभागातून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
जिल्हाभरातून एकूण १३ हजार ६८१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी १३ हजार ६७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ११ हजार ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २२४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. २ हजार २४७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७ हजार ६१६ विद्यार्थी द्वितीय तर ९८३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचे ४ हजार ७३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ८५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ हजार ५६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३५१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ४ हजार ३८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील ८ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार १७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४ हजार २१८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६०२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य शाखेतील २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ विद्यार्थी प्राविण्य श्रैणीत, ७२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १४३ द्वितीय श्रेणीत, २९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एकूण २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसीच्या ४४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १० प्राविण्य श्रेणीत, १४८ प्रथम श्रैणीत, १९९ द्वितीय श्रेणीत तर एक विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. एकूण ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण विद्यार्थ्यांपैकी ७८.३६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ८३.६७ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.
किशन म्हणतो अभ्यासासोबत छंदही जोपासा
९३.५० गुण घेऊन बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या किशन राजेश परतानी याने आपल्या यशात शाळेच्या शिक्षकांकडून मिळालेले योग्य मार्गदर्शन आणि संयुक्त कुटुंब असताना पालकांकडून मिळालेले पाठबळ यांचा वाटा मोठा असल्याचे सांगितले. नियमित अभ्यास करताना क्रिकेट खेळणे, गाणी ऐकणे असे छंदही जोपासले. त्यामुळे मूड फ्रेश करण्यास मदत होते. केवळ पुस्तकात तोंड घालून उपयोग नाही तर छंदही जोपासले पाहीजे असा सल्ला त्याने पुढील वर्षी दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
प्लॅटिनम ज्युबिली शाळेचा विद्यार्थी गेल्यावर्षीही बारावीत जिल्ह्यातून प्रथम होता. ही परंपरा यावर्षीही कायम राखली. त्याबद्दल किशनचा संस्थेचे महासचिव अजीज नाथानी, संचालक निझर देवानी, प्राचार्य रहीम अमलानी यांनी शाळेत सत्कार केला. आपल्याला कॉम्प्युटर सायन्स घेऊन इंजिनिअरिंग करायचे असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
आयएएस होऊन सामान्यांचे दु:ख दूर करणार
९२.१५ गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय स्थान पटकावणाऱ्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रफुल्ल गजानन चलाख याने आपल्याला आयएएस करून सर्वसामान्य लोकांचे दु:ख दूर करायचे असल्याचे सांगितले. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील अवघ्या दोन एकर शेतीचे मालक असलेल्या त्याच्या वडिलांना विद्युत फिटींगची कामे करून उदरनिर्वाह करावा लागतो.
कृषी सहायक असलेले त्याचे काका संतोष चलाख यांच्याकडे तो गडचिरोलीत राहात होता. या यशाबद्दल त्याचा व पालकांचा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, सचिव डी.एम. पाटील म्हशाखेत्री, प्राचार्य जी.एम.दिवटे, पर्यवेक्षक डी.के.उरकुडे आदींनी शाळेत सत्कार केला. इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याही वर्षी सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी
बारावीच्या परीक्षेत मुलींनी मुलांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. जिल्हाभरातील ६ हजार ९२६ मुलांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ हजार ४२७ मुले उत्तीर्ण झाली. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७८.३६ टक्के एवढे आहे. जिल्हाभरातून ६ हजार ७४७ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ५ हजार ६४३ मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांचे प्रमाण ८३.६७ टक्के एवढे आहे.
गडचिरोली तालुक्यातून १ हजार ३९, अहेरी तालुक्यातून ३५७, आरमोरी ६६१, भामरागड ५४, चामोर्शी १ हजार १०, देसाईगंज ६५१, धानोरा ३४७, एटापल्ली २१६, कोरची १९५, कुरखेडा ५३७, मुलचेरा २ हजार ३१४ व सिरोंचा तालुक्यातून २४४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेणाºयांमध्ये मात्र मुले आघाडीवर आहेत.
पुनर्परीक्षार्थींचा निकाल २९.६२ टक्के
यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या ६१२ विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०१८ ची बारावीची परीक्षा देण्यासाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ६११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी २९.६२ टक्के एवढी आहे. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे ४०, कला शाखेचे १३७, वाणिज्य शाखेचा एक व एमसीव्हीसी विभागाचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १५५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Platinum's Kishan Partani is the best in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.