प्लॅटिनमचा मानस पाटील अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:48+5:30
जिल्हाभरातून १५ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ हजार ९६१ मुलांपैकी ७ हजार २६७ मुले उत्तीर्ण झाली. त्यांची टक्केवारी ९१.२८ आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. परीक्षा देणाऱ्या ७ हजार ३४३ मुलींपैकी ६ हजार ९१८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९४.२१ टक्के एवढी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालाने चांगलीच उसंडी मारली असून ९२.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही जिल्ह्यातून सर्वाधिक गुण घेणारा विद्यार्थी देण्याची परंपरा कायम ठेवली. या शाळेचा मानस दीपक पाटील हा ९७.८० टक्के गुण घेऊन सर्वप्रथम तर कारमेल अॅकेडमी चामोर्शीची विद्यार्थीनी पल्लवी नमुदेव कापगते ही ९७ टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे. याशिवाय प्लॅटिनमचीच लिझना सुलेमान लाखानी ही ९६.६० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरी आली आहे.
जिल्हाभरातून १५ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ हजार ९६१ मुलांपैकी ७ हजार २६७ मुले उत्तीर्ण झाली. त्यांची टक्केवारी ९१.२८ आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. परीक्षा देणाऱ्या ७ हजार ३४३ मुलींपैकी ६ हजार ९१८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९४.२१ टक्के एवढी आहे.
परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २३८३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातील ६ जिल्ह्यात हे प्रमाण सर्वात कमी आहे. याशिवाय ६ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ४७५८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १०४४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
सर्वाधिक २६२९ विद्यार्थी चामोर्शी तालुक्यात उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल १८४४ विद्यार्थी गडचिरोली तालुक्यात, १६४७ विद्यार्थी अहेरी तर १३१६ विद्यार्थी आरमोरी तालुक्यात उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व तालुक्यात मुलींचा निकाल चांगला असला तरी भामरागड तालुक्यात मुलींचा निकाल घसरला आहे.
३८.०४ टक्क्यांनी वाढला निकाल
गेल्यावर्षी दहावीचा निकाल अवघा ५४.६५ टक्के लागला होता. यावर्षी मात्र तब्बल ३८.०४ टक्क्यांनी हा निकाल वाढून ९२.६९ टक्क्यांवर पोहोचला. विशेष म्हणजे १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांचीही संख्या यावर्षी वाढली आहे. गुणवत्तेत झालेली ही वाढ आशादायी चित्र निर्माण करणारी आहे.
भामरागड तालुका निकालात माघारला
जिल्ह्यात सर्वात कमी विद्यार्थी भामरागड तालुक्यात उत्तीर्ण झाले आहेत. या तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८२.७० टक्के आहे. उर्वरित सर्व तालुक्यांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्वात चांगला निकाल अहेरी तालुक्याचा (९४.३८) आहे. तसेच मुलचेरा (९४.३७), सिरोंचा (९४.२०), धानोरा (९३.८१) आहे.
मानस होणार केमिकल इंजिनिअर
९७.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात सर्वप्रथम आलेला मानस शिवाजी हायस्कूलचे शिक्षक दीपक पाटील यांचा मुलगा आहे. तो जिल्ह्यातून प्रथम येणे हा क्षण आमच्यासाठी अनपेक्षित असल्याचे दीपक पाटील म्हणाले. गृहिणी असलेल्या आईला मात्र त्याच्या या यशाबद्दल विश्वास होता. त्याच्या या यशात त्याची शाळा प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचा मोलाचा वाटा असल्याचे आईने सांगितले. शिक्षकांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे त्याला हे यश मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले. वडिल दुसºया शाळेत असले तरी नर्सरीपासून मानस प्लॅटिनमला होता. दररोज पहाटे ४ वाजता उठून नियमित अभ्यास करणे आणि शाळेतील शिक्षकांकडून सर्व शंकांचे निरसन करणे हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे तो म्हणाला. केमिकल इंजिनिअर बनण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली.
पल्लवीला बनायचे आहे शास्त्रज्ञ
९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आलेली चामोर्शीच्या कारमेल अॅकेडमीची पल्लवी नमुदेव कापगते हिचे वडील बोमनवार महाविद्यालयात प्राध्यापक तर आई गृहिणी आहे. पल्लवीला संशोधन क्षेत्रात करीअर करायचे असल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तिला शास्त्रज्ञ बनायची इच्छा आहे. तिने आपल्या या यशाचे श्रेय बाबा, आई, काका, काकू, शाळेचे शिक्षकवृंद आणि मोठी बहीण प्रतीक्षा हिने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाला दिले.
लिझना विदेशात जाणार तर मिताली आयएएस होणार
९६.६० टक्के घेऊन तिसरी आलेली प्लॅटिनम शाळेची लिझना सुलेमान लाखानी हिला विदेशात उच्च शिक्षण घ्यायचे आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरीची मिताली कैलास गेडाम हिने ९६ टक्के घेऊन जिल्ह्यात चतुर्थ स्थान पटकावले. तिने आयएएस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली.