नाटकबाजी करणाऱ्यांना समाजाच्या व्यथा कळत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:18 AM2018-04-14T01:18:44+5:302018-04-14T01:18:44+5:30
देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आपल्या सरकारच्या फसव्या प्रसिद्धीचे ढोल वाजविण्यासाठी डॉ.बाबासांहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे नाटक करीत आहे. त्यांना समाजाच्या व्यथा कळतच नाही, अशी टिका करून गोरगरीबांचे उत्थान करण्यासाठी ठोस, कायदेशीर व रचनात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे, हे मोदी सरकारने लवकर समजावे, असा इशारा बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष अॅड.सुरेश माने यांनी दिला.
गडचिरोलीत शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत अॅड.माने बोलत होते. यावेळी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी, कैलास नगराळे, विलास कोडापे, मिलिंद बांबोळे, सदाशिव निमगडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माने म्हणाले, सर्वात जास्त हिंसाचार भाजपच्या राजवटीत दलितांवर झाला आहे. अनेक राज्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात दलितांवरील गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. शासनाने किती गुन्हे मागे घेतले याचे आकडे द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप सरकारने लोकशाही आणि राज्यघटनेवरील हल्ले थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूरजागड खाण प्रकरणी भाजप नेते आधी एक बोलत होते, आता सत्तेत आल्यावर वेगळी भूमिका घेत आहेत. नेमकी भूमिका कोणती हे त्यांनी स्पष्ट करावे, असे माने म्हणाले.
समाजातील कोणताही वर्ग आता भाजपचे समर्थन करायला तयार नाही. त्याचा फटका राज्यात येणाºया निवडणुकांत भाजपला निश्चित बसेल. शिवाय काँग्रेस आणि भाजपच्या धोरणांमध्ये फारसा फरक नाही.
त्यामुळे समर्थ पर्याय म्हणून बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी राज्यात विधानसभेच्या अनेक जागा लढवेल, असेही अॅड. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारने तेंदूपत्ता संकलन करावे
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा असणाऱ्या तेंदूपत्ता व्यवसायावर यावर्षी ठेकेदारांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. यामुळे हजारो मजुरांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी आणि सरकारने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी बीआरएसपीचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी यांनी यावेळी केली.