स्टेडियमवर खेळाडूंचे बेहाल

By admin | Published: October 15, 2015 01:33 AM2015-10-15T01:33:43+5:302015-10-15T01:33:43+5:30

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत येथील जिल्हा स्टेडियमवर बुधवारपासून शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

Players at the stadium are helpless | स्टेडियमवर खेळाडूंचे बेहाल

स्टेडियमवर खेळाडूंचे बेहाल

Next

सुविधांचा अभाव : क्रीडा विभागाच्या नियोजन शून्यतेचा फटका
गडचिरोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत येथील जिल्हा स्टेडियमवर बुधवारपासून शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मात्र या मैदानावर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी पेंडॉल, चेचिंग रूमची व्यवस्था करण्यात आली नाही. पाण्याची व्यवस्था अपुरी होती. डेकोरेशन, लाऊडस्पिकर व प्रथमोपचार व इतर सुविधेअभावी येथे स्पर्धेकरिता आलेल्या जवळपास ५० क्रीडा शिक्षक व ८०० खेळाडूंचे प्रखर उन्हात प्रचंड हाल झाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा स्टेडियमवर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षाखालील खेळाडू मुला, मुलींचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा कार्यालयामार्फत बाराही तालुक्यातील शाळांना पत्र देऊन सूचित करण्यात आले होते. यापूर्वी तालुकास्तरावर झालेल्या शालेय स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या खेळाडूंची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. याकरिता बाराही तालुक्यातील शाळांनी सहभागी विद्यार्थी संख्येनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला क्रीडा शुल्क अदा केले आहे. १००, २००, ४००, ६००, ८००, १५०० ते ५००० मीटर अंतरापर्यंत दौड स्पर्धा, लांबउडी, उंचउडी, गोळा, भाला, थाळीफेक तसेच रिले दौड स्पर्धेसाठी बाराही तालुक्यातून बुधवारी जवळपास ८०० ते ९०० च्या संख्येत खेळाडू विद्यार्थी गडचिरोलीच्या जिल्हा स्टेडियमवर सकाळी दाखल झाले. सध्या प्रचंड उकाडा असून प्रखर उन्ह राहत असल्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्टेडियमवर खेळाडूंना बसण्यासाठी पेंडालची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्टेडियमवर पेंडाल, डेकोरेशन, चेचिंग रूम तसेच लाऊड स्पिकर व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. (स्थानिक प्रतिनिधी)

खेळाडूंचा प्रचंड भ्रमनिरास
जिल्हा परिषद शाळांच्या बिट व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्व सोयीसुविधा खेळाडूंना पुरविल्या जातात. जिल्हास्तरावरही स्टेडियमवर सर्व सोयीसुविधा राहतील, असा खेळाडू विद्यार्थ्यांचा समज होता. मात्र या जिल्हा स्टेडियमवर कोणतीही सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना प्रखर उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. एकूणच खेळाडूंचा पुरता भ्रमनिरास झाला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्टेडियमवर आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. मी स्वत: आदल्या दिवशी स्टेडियमवर जाऊन विविध खेळाच्या ग्राऊंडची आखणी करून दिली. बुधवारी क्रीडा उपसंचालकांची बैठक नागपुरात असल्याने आपण सकाळीच गडचिरोलीवरून नागपुरात पोहोचलो. जिल्हा स्टेडियमवर कोणत्या सुविधांचा अभाव होता, याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेणार आहोत. पुढील वेळेस शालेय क्रीडा स्पर्धेसाठी परिपूर्ण चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करू.
- चंद्रदीप शिंदे,
जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली

Web Title: Players at the stadium are helpless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.