झाडीपट्टीचे नाट्य कलावंत उपेक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:44 AM2021-06-09T04:44:42+5:302021-06-09T04:44:42+5:30
देसाईगंज : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतांपुढे वृद्धापकाळामुळे उदरनिर्वाहाचा ...
देसाईगंज : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतांपुढे वृद्धापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐेरणीवर आहे.
टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.
मुख्यालयाला खाे
एटापल्ली : तलाठ्यांना मुख्यालयाची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी सजाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे. यासाठी उपाययाेजना करावी.
शिव मंदिरात गर्दी
सिराेंचा : तालुक्यातील सोमनूर संगम येथे महाशिवरात्रीच्या जत्रेला परवानगी नसली तरी सध्या शिवमंदिरात दर्शनासाठी २०० ते ३०० मीटर डोंगरावर चढून दर्शन घेणाऱ्यांची गर्दी हाेत आहे. महादेवाच्या दर्शनासाठी अनेक वृद्ध भाविकही जात आहेत.
सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करा
एटापल्ली : जिल्ह्यात सिकलसेल वाहक रुग्णांची संख्या १० ते १२ हजारांवर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्याने संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी आहे.
गतिरोधक केव्हा लावणार?
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले
एटापल्ली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाहीत.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने या योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करावेत, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
शहरात डुकरांचा बंदोबस्त करा
आलापल्ली : आलापल्ली शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगर पंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी शहरातही गेल्या काही दिवसांपासून माेकाट डुकरे व जनावरांचा हैदाेस वाढला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासन सुस्त आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे फिरत राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा ही मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष झाले.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैन्यावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही. स्वतंत्र इमारती बांधण्याची गरज आहे.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.
शौचालयांची स्वच्छता करा
देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयांत फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा
चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.
पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.
विनापरवानगीने घरांचे बांधकाम
गडचिरोली : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दरवर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. या घरांवर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगीने बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत चालली आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बसस्थानकातील वाहने नियंत्रणाविना
गडचिरोली : येथील बसस्थानक परिसरात प्रवासी, चालक व वाहकांची दुचाकी व चारचाकी वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र कडेकोट व्यवस्था नाही, तसेच शेडही नाही. त्यामुळे नागरिक वाहने अस्ताव्यस्त उभी करतात. पोलीस बंदोबस्ताअभावी बसस्थानक परिसरातील खासगी वाहने रात्री नियंत्रणाअभावी बेवारस राहतात.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात वीज व इंटरनेटची समस्या सतत जाणवत असते. त्यामुळे हस्तलिखित सातबारा पुरवावा, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक
गडचिरोली : बाल रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला लागून दुकाने थाटण्यात आली आहेत. बालक पळवून नेण्यासारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. अतिक्रमणामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण झाला आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणे गरजेचे आहे.