जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी ग्रा.पं.चे ठराव पाठवा
By admin | Published: September 29, 2015 02:58 AM2015-09-29T02:58:23+5:302015-09-29T02:58:23+5:30
राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी
ंगडचिरोली : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत असून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला पाठवावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, पंकज गुड्डेवार, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि.प. गट नेते केसरी उसेंडी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, अॅड. गजानन दुगा, सुकमा जांगधुर्वे, शांता परसे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, सतिश विधाते, भामरागड तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, मुलचेरा तालुकाध्यक्ष रवींद्र शहा, विलास ढोरे, रजनीकांत मोटघरे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम, नंदू वाईलकर, सुरेश भांडेकर, निकेश नैताम, देवाजी सोनटक्के, केदारनाथ कुंभारे, आशिष सुफी, रामभाऊ नन्नावारे, नरेंद्र भरडकर आदी उपस्थित होते.
आगामी काळात जिल्ह्यात १० नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. नगर पंचायतीच्या निवडणुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवाव्या. नगर पंचायतीला निवडून येणाऱ्या सदस्यास विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केले.
काँग्रेस पक्ष या निवडणुका स्वबळावर लढणार असून स्थानिक लोकांनी उमेदवारांची नावे पॅनलमध्ये टाकून ती यादी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे पाठवावी, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेसच्या कुठल्याही संघटना व विंगने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व तालुका काँग्रेस अध्यक्षांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही उपक्रम राबवू नये, अशी सूचनाही या बैठकीतून करण्यात आली.
या बैठकीत जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट व केसरी उसेंडी यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जिल्हास्तरावर घेतलेली नियोजन समितीची बैठक ही पक्षाची बैठक समजून घेतली. यात विकास आणि नियोजनावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी घणाघाती टीका केली. (स्थानिक प्रतिनिधी)