एटापल्लीत प्लास्टिक मुक्तीचा संकल्प
By admin | Published: January 2, 2017 01:40 AM2017-01-02T01:40:02+5:302017-01-02T01:40:02+5:30
स्वच्छ, सुंदर शहर असले तर निरोगी व आरोग्यदायी वातावरण असते. अस्वच्छतेमुळे रोगराईला आमंत्रण
नगर पंचायतीचा पुढाकार : शहरात ठिकठिकाणी लावले बॅनर; पदाधिकारी सरसावले
एटापल्ली : स्वच्छ, सुंदर शहर असले तर निरोगी व आरोग्यदायी वातावरण असते. अस्वच्छतेमुळे रोगराईला आमंत्रण मिळून नागरिकांसह सामाजिक स्वास्थ्यही बिघडते. शहर सुंदर स्वच्छ व निरोगी असावे या हेतूने स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प रविवारी करण्यात आला. याकरिता पदाधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी बॅनर व पोस्टर लावण्यात आले.
एटापल्ली शहरात जनजागृती करणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. शहरात प्लास्टिक घनकचरा आढळू नये, याकरिता ‘पॉलिथीन की नही कोई शान, मिटा देंगे इसका नामोनिशान’ आदींसह विविध घोषवाक्यांसह जनजागृती केली जात आहे. याबरोबरच प्लास्टिक मुळे कर्करोगाला आमंत्रण, जनावरांना हानी व रोगराई याबाबत तसेच प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली जात आहे. रविवारी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने पदाधिकाऱ्यांमार्फत शहरातील प्रमुख मार्केट तसेच व्यावसायिक, दुकानांना भेटी देऊन प्लास्टिकच्या दुष्परिणामीची माहिती घेण्यात आली. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकोनी प्लास्टिकचा वापर टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, उपाध्यक्ष रमेश गंपावार, नगरसेवक दीपक सोनटक्के, पाणी पुरवठा सभापती जितेंद्र टिकले, बांधकाम सभापती दीपयंती पेंदाम, महिला व बाल कल्याण सभापती सगुणा हिचामी, उपसभापती भारती इष्टाम, नगरसेवक किसन हिचामी, ज्ञानेश्वर रामटेके, तानाजी दुर्वा, रमेश मठामी, राहूल गावडे, निर्मला कोंडबत्तुलवार, शारदा उल्लीवार, रेखा मोहुर्ले, सुनिता चांदेकर, किरण लेकामी, योगेश नलावार, किर्ती कागदलवार उपस्थित होत्या. वापरात असलेल्या प्लास्टिकसाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)