कुलभट्टी-बोधनखेडा रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:43 AM2021-09-08T04:43:51+5:302021-09-08T04:43:51+5:30
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा भामरागड : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या ...
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
भामरागड : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. कियर, बेजूरसह अन्य गावांतील सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. प्रशासनाने येथे उपाययाेजना करण्याची गरज आहे.
कैकाडी वस्तीत सोईसुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र, त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत. येथे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी हाेत आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यांवर बसतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते असल्याचे दिसते. गावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष हाेत आहे.
अहेरी उपविभागातील पशुपालक झाले त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते कुणीही खरेदी करीत नाही.
कुटुंब कल्याण नियोजनाची गरज
मूलचेरा : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत गैरसमज असल्याचे दिसते.
जळाऊ लाकडांची कमरतताच
कोरची : येथे विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी वास्तव्य करतात; परंतु त्यांना वेळेवर जळाऊ लाकडे उपलब्ध होत नाहीत. स्थानिक नागरिकांना वनविभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत आहे. बहुतांश डेपोंवर जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याकडे वनविभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
आरोग्यसेविकांची पदे रिक्त
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६ आरोग्यपथके व ३७६ उपकेंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी आरोग्यसेवा देण्याचे काम परिचारिका करते. मात्र, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दरहजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष आहे.