तळेगाव-राजोली मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:57 PM2019-06-05T23:57:09+5:302019-06-05T23:57:29+5:30
कुरखेडा येथून तळेगावकडे व पुढे राजोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास खडतर बनला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा येथून तळेगावकडे व पुढे राजोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास खडतर बनला आहे.
कुरखेडा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून येथे राष्टÑीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. शिवाय कुरखेडा येथे शाळा, महाविद्यालय आहे. बाजारपेठही असल्याने सभोवतालच्या गावातील अनेक नागरिक दररोज कुरखेडा येथे विविध कामानिमित्त येतात. तळेगाव-राजोली मार्गावरूनच नागरिकांचे नेहमी आवागमन असते. मात्र सदर मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने या मार्गावरून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सर्व प्रकारच्या मालाची कुरखेडा शहरातूनच तळेगाव व राजोली भागात वाहतूक होत असते. सदर मार्ग वर्दळीचा असूनही या मार्गाची पक्की दुरूस्ती करण्यात आली नाही. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी या रस्त्याने आवागमन करतात. मात्र त्यानंतर लोकप्रतिनिधी या मार्गाकडे फिरून पाहत नाही. संबंधित विभागाने सदर रस्त्याचे पक्की दुरूस्ती करावी. संपूर्ण रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी राजोली भागातील नागरिकांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावाला जाणाºया रस्त्यांची अवस्था अशीच झाली आहे. दुरूस्तीबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.