प्लॉट होणार स्वस्त
By admin | Published: May 24, 2014 11:34 PM2014-05-24T23:34:49+5:302014-05-24T23:34:49+5:30
शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन शहर विकासाचा नवीन प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामध्ये ८५३.४५ हेक्टर जागा निवासी झोन (येलो बेल्ट) म्हणून आरक्षित ठेवण्यात
प्रारूप आराखडा तयार : ८५३.४५ हेक्टरचे निवासी झोन दिगांबर जवादे - गडचिरोली शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन शहर विकासाचा नवीन प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामध्ये ८५३.४५ हेक्टर जागा निवासी झोन (येलो बेल्ट) म्हणून आरक्षित ठेवण्यात आली आहे. एवढी जागा घर बांधणीसाठी उपलब्ध होणार असल्याने भविष्यात प्लॉटच्या किंमती कमी किंवा स्थिर राहण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली येथे अनेक नवीन कार्यालये सुरू झाली. या कार्यालयांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी व अधिकारी गडचिरोली शहरात दाखल झाले. त्याचबरोबर या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन रोजगार निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील हजारो कुटुंब गडचिरोली येथे वास्तव्यास आले. त्यामुळे गडचिरोली शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली. शहराचा विकास नियोजनबध्द पध्दतीने व्हावा यासाठी जिल्हा निर्मितीनंतर सर्वप्रथम १९९१ साली शहर विकासाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतरही लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या राहण्याची व्यवस्था करण्याबरोबरच शहराचा विकास नियोजनबध्द पध्दतीने करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने २0१४ मध्ये शहर विकासाचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये विसापूर मार्ग, रामपूर तुकूम, देवापूर, लांजेडा वार्ड, सोनापूर आदी परिसरातील ८५३.४५ हेक्टर जागा निवासी झोनसाठी आरक्षीत करण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासनाने या निवासी झोनला मान्यता दिली आहे. आरक्षीत केलेल्या जागेबद्दलचे आक्षेप वृत्तपत्रात ११ मार्च २0१४ रोजी जाहिरात देऊन मागविण्यात आले होते. जवळपास १२५ नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपांवर सुनावणी करण्यासाठी प्लॅनिंग कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये नगर परिषेच्या स्थायी समितीचे तीन सदस्य व शासनाचे चार तज्ज्ञ राहणार आहेत. आक्षेपांबद्दल निर्णय घेऊन नगर परिषदेला सादर करणार आहे. सर्वसाधरण सभेमध्ये याबद्दलचा अंतिम ठराव घेतल्यानंतर अंतिम प्रारूप आराखडा शासनाकडे सादर केला जाणार आहे. शासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतर सदर जागा घर बांधणीसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. गडचिरोली शहराच्या उत्तरेला कठाणी नदी, पूर्व व दक्षिणेला झुडपी जंगल व पश्चिमेला ओलीताखालील शेती असल्याने शहर विस्तारावर फार मोठय़ा र्मयादा पडल्या होत्या. एवढेच नाही तर २0 वर्षाचा कालावधी लोटूनही शहर विकासाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला नसल्याने आहे त्याच जागेचे प्लॉट पाडण्यात येत होते. मागील काही दिवसापासून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मागणीच्या तुलनेत प्लॉट अत्यंत कमी उपलब्ध असल्याने प्लॉट विक्रेते मन मानेल तेवढी किंमत आकारत होते. किरायाच्या घरात राहून आयुष्य काढलेले जोडपे शेवटी त्रस्त होऊन कितीही किंमत मोजून प्लॉट खरेदी करीत होते. शहर विकासाच्या प्रारूप आराखड्याला शासनाने मंजूरी दिल्यानंतर ८५३.४५ हेक्टर जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध होणार आहे. एवढी जागा उलपब्ध झाल्यानंतर प्लॉटच्या किंमती आपोआप कमी किंवा स्थिर राहण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. यासाठी शहर विकासाचा प्रारूप आराखडा मंजूर होईपर्यंत एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.