फळांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात जात आहे विष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:21+5:302021-09-03T04:38:21+5:30
देसाईगंज : देसाईगंज शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून, विक्रेत्यांकडून ‘कार्बाईड’ या रासायनिक पदार्थाचा वापर सर्रास केला जात ...
देसाईगंज : देसाईगंज शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून, विक्रेत्यांकडून ‘कार्बाईड’ या रासायनिक पदार्थाचा वापर सर्रास केला जात आहे. अशा पद्धतीने कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक आहेत. त्यामुळे अशी फळे विकणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र, त्यासाठी या विभागाकडे मनुष्यबळच नसल्यामुळे सर्रास विषयुक्त फळांचे सेवन सर्वजण करताना दिसून येत आहेत.
सरकारने सन १९७९ मध्ये 'प्रिव्हेंशन ऑफ फूड ॲडल्ट रेशन ॲक्ट’ तयार करून त्यात कलम ४४ (अ, आ)चा अंतर्भाव केला. त्यानुसार कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यावर बंदी घालून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, कुठेच कारवाई होत नाही. नागरिक दररोज आरोग्यवर्धक म्हणून फळे सेवन करतात. तसेच आजारी व्यक्तींना, लहान मुलांना सकस व पौष्टिक आहार म्हणून खायला देतात. ती फळे नैसर्गिकरीत्या पिकू न देता कार्बाईडने पिकविलेली असतात. ती दिसायला अत्यंत आकर्षक असली तरी शरीराला अपायकारक असतात.
फळे पौष्टिक आहार म्हणून लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना दिली जातात. अनेक फळे, फळांचे ज्युस रोजच्या वापरात असतात. बहुतेक फळे नैसर्गिकरीत्या पिकविण्यासाठी अवधी जास्त लागत असल्याने ती सरळसरळ कार्बाईडने पिकविण्याची पद्धती अवलंबिली जाते. त्यामुळे हे मानवी शरीरावर परिणाम करणारे स्लो पॉयझन आपण शरीरात घेतो. अशा कृत्रिमरीत्या फळे पिकविणाऱ्या व्यापारी, विक्रेत्यांविरुद्ध संबंधित विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.
(बॉक्स)
अशी होते रासायनिक प्रक्रिया
- फळांना पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा पाण्याशी संबंध येऊन रासायनिक क्रिया घडते व त्यातून ॲसिटीलीन व ईथिलीन हा वायू तयार होतो. ईथिलीनमुळे फळे पिकतात. ॲसिटिलीनचा काहीही उपयोग होत नाही; पण हा वायू मानवी शरीराला हानिकारक ठरतो.
- या वायूमुळे भोवळ येणे, मळमळ, डोकेदुखी असे परिणाम दिसून येतात. ही फळे खाणाऱ्यांमध्ये या दुष्परिणामांची व्याप्ती किती असते हे स्पष्ट नसले तरी फळे पिकविण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या हायड्रोकार्बन्सचा (जे फळात विरघळतात) वाईट परिणाम खाणाऱ्यांच्या पचनसंस्थेवर होतो.
010921\5352img_20210901_181129.jpg
शहरात असे पिकविलेले हे कार्बाईडयुक्त फळांची विक्री.