शासकीय आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:44 PM2019-07-11T23:44:10+5:302019-07-11T23:44:57+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळाल्याने विद्यार्थिनींची प्रकृती सुधारत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळाल्याने विद्यार्थिनींची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्यावर अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, खमनचेरु येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना आज सकाळी १० वाजता जेवण देण्यात आले. जेवणात पानकोबी, आलूची भाजी, वरण, भात, पोळी असा मेनू होता. जेवण आटोपल्यानंतर दुपारी १२ वाजताच्यादरम्यान काही विद्यार्थिनींना पोटात मळमळ होऊन उलटीचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता ५७ विद्यार्थिनींना हा त्रास सुरू झाला. त्यामुळे १.३० वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना रुग्णवाहिकेने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात सायंकाळपर्यंत सर्व विद्यार्थिनीवर उपचार सुरु होते.
विषबाधा झालेल्या ५७ विद्यार्थिनींमध्ये वर्ग १ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यांना अन्नातून विषबाधा कशी झाली, विद्यार्थिनींना दिलेल्या जेवणात कोणता पदार्थ शिळा होता का, याची चौकशी केली जात आहे. जेवणाची व्यवस्था पुरु ष अधीक्षक ए.एम.मसतकर यांच्याकडे असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस.ए.नन्नेवार यांनी ‘लोकमत’ला दिली. घटनेची माहिती अहेरी उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळताच पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर रोहनकर यांनी तपास सुरू केला आहे.
आधी तीन मुलींना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. ही बाब लक्षात आल्यावर मी इतर शिक्षकांना माहिती दिली व वेळ न घालवता अशा प्रकारचा त्रास असणाऱ्या एकूण ५७ विद्यार्थिनींना अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
- एस.ए.नन्नेवार, मुख्याध्यापक
घटनेची माहिती मिळताच दोन सहायक प्रकल्प अधिकाºयांना चौकशीसाठी पाठविण्यात आले. चौकशीअंती या घटनेसाठी दोषी असणाºयांवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ.इंदूराणी जाखड, प्रकल्प अधिकारी
तथा सहायक जिल्हाधिकारी