पोलिसांनी अडविला तेंदू ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:06 AM2018-06-03T01:06:58+5:302018-06-03T01:06:58+5:30

ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय.

Police Adva Tendu Truck | पोलिसांनी अडविला तेंदू ट्रक

पोलिसांनी अडविला तेंदू ट्रक

Next
ठळक मुद्देकसनसूर येथे कारवाई : सकाळपासून ट्रक पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.
रामदास जराते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यंदा घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपानांचे संकलन केले. या तेंदूपानांची राजोली, मूल येथील गोदामात साठवणूक करण्याकरिता शनिवारपासून वाहतूक सुरू करण्यात आली. वाहतुकीकरिता वनविभागाकडून टी.पी.बुक घेऊन ग्रामसभेने संबंधित वाहनांना टी.पी.जारी केली. मात्र, सकाळी १० वाजेपासून कसनसूर पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोर दोन ट्रक तेंदूपानांसह थांबवून ठेवले आहे. रात्री ७ वाजेपर्यंत सदर ट्रक पोलिसांच्या ताब्यातच होते. एकीकडे एट्टापल्ली तालुक्यातील इतर ग्रामसभांनी तेंदूपत्ता न तोडल्याने लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतांना घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांचे ट्रक थांबविण्याचा प्रकार चिंताजनक आहे. चिरीमिरीकरिता नाहक त्रास देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी व ग्रामसभेला तेंदूपानांची वाहतूक करण्यास सहकार्य करावे. तसेच वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.
याबाबत काही ग्रामस्थांनी ट्रक अडविणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला विचारणा केली असता, साहेब यायचे आहेत, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही, असे उत्तर देत होता. नेमक्या कोणत्या कारणासाठी ट्रक दिवसभर अडवून ठेवला, हे कळायला मार्ग नाही.

Web Title: Police Adva Tendu Truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.