महासंचालकांकडून पोलिसांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:26 AM2019-04-14T00:26:12+5:302019-04-14T00:27:07+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्यानंतर शौर्याने तो हल्ला परतावून लावलेल्या शूर जवानांचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी कौतुक केले असून, त्यांना रोख बक्षीस दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्यानंतर शौर्याने तो हल्ला परतावून लावलेल्या शूर जवानांचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी कौतुक केले असून, त्यांना रोख बक्षीस दिले आहे.
११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. निवडणुकीदरम्यान घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी ठिकठिकाणी भूसुरुंग पेरुन ठेवले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी १० एप्रिलला गट्टा-जांभिया पोलीस मदत केंद्रांतर्गत वटेली येथील मतदान केंद्रावर पोलीस पथक जात असताना दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडवून आणला. यात केंद्रीय राखीव दलाचे उपनिरीक्षक सुनीलकुमार पटेल, हवालदार राजीवकुमार रंजन हे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर मतदानाच्या दिवशी ११ एप्रिलला पुरसलगोंदी गावाजवळ दुपारी सव्वातीन वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण करुन परत येणाऱ्या पोलिसांवर नक्षल्यांनी गोळीबार करुन भूसुरुंगस्फोट केला. यात जिल्हा पोलिस दलाचे शिपाई भिमराव दब्बा व हरिदास कुळेटी हे दोन जवान जखमी झाले. दोन्ही घटनांमध्ये पोलीस जवानांनी नक्षल्यांशी शौर्याने लढून त्यांचा हल्ला परतावून लावला. चारही जवानांवर नागूपर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी या जवानांचे कौतुक केले असून, त्यांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस दिले आहे.