पोलिसांनी मोहफूल हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त
By admin | Published: March 26, 2017 12:41 AM2017-03-26T00:41:20+5:302017-03-26T00:41:20+5:30
आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी गुरूवारी तालुक्यातील कुकडी व विहिरगाव शेतशिवार परिसरात ....
कुकडी, विहिरगावात धाड : १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरमोरी : आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी गुरूवारी तालुक्यातील कुकडी व विहिरगाव शेतशिवार परिसरात अनेक ठिकाणी धाडी टाकून मोहफूल हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. येथून मोहफुलाचा सडवा व त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून एकूण १ लाख ६१ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाणेदार महेश पाटील यांनी २३ मार्च रोजी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह कुकडी येथील संतोष कुमरे यांच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता, एक हजार रूपये किमतीची १० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. संतोष कुमरे याच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुकडी येथील शेत शिवारातील हातभट्ट्यावर पोलिसांवर धाड टाकून येथून सडव्याने भरलेले २०० लिटर मापाचे तीन प्लास्टिक ड्रम, मोहफूल सडव्याने भरलेले ५० लिटर मापाचे नऊ प्लास्टिक ड्रम, सात जर्मन केतली, ९० लिटर मोहफूल दारू, मातीचे २६ मडके व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पुन्हा कुकडी, विहिरगाव परिसरात धाड टाकली व येथून २० लिटर मोहफूल दारू, प्लास्टिक कॅन, पाण्याची रिकामी टँक व इतर साहित्य मिळून एकूण २२ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिसऱ्या एका घटनेत गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे उसेगाव ते आष्टा रस्त्याने दुचाकीने देशी दारूची आयात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी उसेगाव ते आष्टा दरम्यानच्या रस्त्यावर सापळा रचला. दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दुचाकीवरील इसमांनी दारूने भरलेले दोन पोते तिथेच टाकून भरधाव वेगात पळून गेले. सदर पोत्याची पाहणी केली असता, येथे ४० हजार रूपये किमतीच्या देशी दारूच्या ८०० निपा आढळून आल्या. आरोपी विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारसह दीड लाखांची दारू पकडली
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक यांनी सापळा रचून शनिवारी गोकुलनगर परिसरात कार अडवून येथून कारसह दीड लाखांची दारू जप्त केली. चामोर्शी मार्गावरून गोकुलनगरकडे कारने दारूची वाहतूक होत होती. पोलिसांनी गणेश मंदिराजवळ सापळा रचून एक लाखाची कार व ५० हजाराची दारू जप्त केली. या प्रकरणी शालिक खटूजी कावळे, गौतम कुसूमराव चौधरी रा. नागभिड यांच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.