पोलीस शिपायाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 01:13 PM2022-02-21T13:13:13+5:302022-02-22T12:02:25+5:30
अहेरी (गडचिरोली) : येथील पॉवर हाऊस कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या पोलीस शिपायाने आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून ...
अहेरी (गडचिरोली) : येथील पॉवर हाऊस कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या पोलीस शिपायाने आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली. प्रमोद शेकोकर असे त्या शिपायाचे नाव आहे.
येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कर्तव्यावर असलेले शेकोकर यांची काही दिवसांपासून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटी लागली होती. त्यांची पत्नी पोलीस विभागातच असून, त्या भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
शेकोकर यांच्या निवासस्थानाचा दरवाजा आतमधून बंद असल्याने दुसऱ्या घरातून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मृत प्रमोद शेकोकर हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचे समजते.