पोलिसांनी निर्माण केली जनावरांसाठी पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:39 PM2018-04-05T23:39:09+5:302018-04-05T23:39:09+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह प्राण्यांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्यासाठी जनावरांना वनवन भटकावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह प्राण्यांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्यासाठी जनावरांना वनवन भटकावे लागत आहे. ताडगाव पोलीस व सीआरपीएफ जवानांनी गावाजवळ प्राण्यांसाठी पाणपोई तयार केली आहे.
भारामगड तालुक्यात पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी व नाले असले तरी या नदी, नाल्यांवर बंधारे नाही. त्यामुळे पावसाळ्यात पूर येते. पाणी अडविले जात नसल्याने पावसाळा संपताच संपूर्ण पाणी वाहून जाते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या तुलनेत या भागात विहीर, हातपंप यासारख्या पाण्याच्या स्त्रोतांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. परिणामी पावसाळा संपताच पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्यास सुरूवात होते. अनेकवेळा हातपंप बंद असल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेत नाही. याचा परिणाम म्हणजे, पाणी टंचाई आणखी तीव्र होते. याचा फटका दुर्गम भागातील नागरिकांना बसण्याबरोबरच पाळीव जनावरे व वन्यजीवानांही बसतो.
पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन पोलीस मदत केंद्रातर्फे गावाजवळच जनावरांना पाणी पिण्यासाठी टाका बांधला आहे. या टाक्यामध्ये दरदिवशी दोनवेळा पाणी टाकले जात आहे.
दरदिवशी नियमितपणे पाणी उपलब्ध होत असल्याने गावातील जनावरेही या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत आहेत. परिणामी दिवसभर या परिसरात पाळीव प्राण्यांची गर्दी होत आहे. पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे गावातील पशुपालकांनी कौतुक केले आहे. सदर उपक्रम इतर पोलीस स्टेशनसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.