दुर्गम भागात शासकीय योजना पोहोचविण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:42+5:302021-02-15T04:32:42+5:30
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने समाजकल्याण विभाग, परिवहन, आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या सहकार्याने १२ फेब्रुवारी रोजी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातील ...
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने समाजकल्याण विभाग, परिवहन, आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या सहकार्याने १२ फेब्रुवारी रोजी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातील एकलव्य हॉलमध्ये दिव्यांगांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित नागदेवते, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नरेश बीडकर, डॉ. कांबळे, समाजकल्याण निरीक्षक निलेश कोरडे, आगार व्यवस्थापक मनीष पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. परंतु, गडचिरोलीसारख्या दुर्गम अतिदुर्गम भागात या योजना सोयी सुविधांअभावी पोहोचू शकल्या नाही. बरेच नागरिक योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. अशा लोकांना मदत करण्यासाठी पोलीस विभाग पुढाकार घेत आहे. पोलीस विभागाच्या वतीने गावागावांत मेळावे आयोजित करून योजनांची परिपूर्ण माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे. एवढेच नव्हे, तर लाभ घेण्यासाठी काय अडचणी आहेत. याचाही विचार पोलीस विभाग करीत आहे. ज्या ज्या सुविधांचा लाभ मिळवून देणे शक्य आहे, अशा सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अधीक्षक गोयल यांच्या हस्ते एकूण ३१७ दिव्यांग नागरिकांना मोफत यूआयडी प्रमाणपत्र, मोफत बस सवलत पास वितरित करण्यात आले. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याशिवाय दिव्यांग नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेची माहिती देऊन त्यांचे फार्म भरून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व त्यांचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.